रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना १४ एप्रिल झाले तरी पूर्ण वेतन झालेले नाही. महामंडळाने आर्थिक कोंडीचे कारण देत मार्च महिन्याचे ५६ टक्केच वेतन कर्मचाऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना फक्त ७ कोटीच प्राप्त झाले. उर्वरित साडेपाच कोटी आज (ता. १५) देण्याचा वायदा शासनाने केल्यामुळे साडेतीन हजार कर्मचारी मंगळवार उजाडण्याची वाट पाहात आहेत.
शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्य वेतनासाठी महिन्याला महामंडळाकडे सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम वर्ग केली जाते; पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत आहेत. यंदा कमी निधी मिळाला असतानाच महामंडळाकडून एसटी बँकेला ४० कोटी रुपयेइतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जापोटी द्यावी लागली. त्यामुळे महामंडळाकडे निधीची कोंडी जास्तच वाढली. एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ, ग्रॅच्युईटी, बँक कर्ज, एलआयसी अशी साधारण ३ हजार ५०० कोटी रुपयांची देणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा महामंडळाकडून संबंधिक संस्थांकडे वर्ग केली गेली नाही.
एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांसह इतरांना देणी असलेली थकीत देणी सात हजार कोटी रुपयांवर गेली आहे. यंदा महामंडळाने शासनाकडे मार्च महिन्याच्या वेतनासह इतर थकीत देणीसाठी ९२५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती; परंतु २७२ कोटी ९६ लाख रुपयेच मिळाले. त्यातील ४० कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेडीसाठी महामंडळाने एसटी बँकेकडे वर्ग केले.
महामंडळाने आर्थिक कोंडी दाखवून मार्च महिन्यात ५६ टक्केच वेतन देण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये एसटीचे चालक, वाहक कार्यशाळेतील कर्मचारी, कार्यलयीन कर्मचारी, अधिकारी असे एकूण ३ हजार ५०० कर्मचारी आहेत. त्यांना दरमहिन्याला वेतनापोटी साडेबारा कोटी द्यावे लागतात; परंतु महामंडळाकडून ५६ टक्के म्हणजे ७कोटी आले. उर्वरित साडेपाच कोटींची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. अर्धाच पगार आल्याने कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक अडचण झाली आहे. मंगळवारी (ता. १५) उर्वरित पगार देण्यार असल्याचा शब्द शासनाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 15-04-2025














