रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या ७०० शाळांवर कॅमेऱ्याचा वाँच

रत्नागिरी : बदलापूर येथील घटनेला ८ महिने पूर्ण होत आहे. मात्र, जिल्ह्यामधील माध्यमिक शाळांतील सीसीटीव्हीची आकडेवारी गुलदस्त्यातच आहे. दुसऱ्या बाजूला मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षात सीसीटीव्ही बसणार आहेत. पहिल्या टप्प्यात ७०० शाळांमध्ये कॅमेरे बसणार असून यासाठी ४ कोटी रुपये मंजूरसुद्धा झाले आहेत. सध्या सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाला. त्यानंतर शासनाने राज्यातील सर्व शाळांत एका महिन्यांच्या आत सीसीटीव्ही बसवावेत, असे आदेश २१ ऑगस्टला काढले होते. शालेय सुरक्षा चांगली होण्यासाठी उपाययोजना करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. खासगी शाळांमध्ये तर १ महिन्याच्या आत शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश जारी केले होते. या सूचना आणि तरतूदींचे पालन न केल्यास शाळांचे अनुदान रोखणे किंवा मान्यता रद्द करणे असे सक्त आदेश शासनाने दिले आहेत.

शासनाने आदेश काढल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने ४७८ शाळांना पत्र काढून तातडीने सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आतापर्यंत किती शाळांत सीसीटीव्ही बसवले आहेत याची आकडेवारी माध्यमिक शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही.

प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे साडेआठ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. त्यापैकी ४ कोटी रुपये सध्या मंजूर केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण २४५१ शाळा आहेत. या सर्व शाळांसाठी साडेआठ कोटी मागितले आहेत.

आता मात्र मंजूर झालेल्या रकमेतून ज्या मोठ्या शाळा आहेत अशा ७०० शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

नव्या शैक्षणिक वर्षात या सर्व शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात आहे. सध्या कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात किमान 300 शाळांमधील विद्यार्थी नजरेखाली असणार आहेत.

सीसीटीव्ही बसतील; पण बिलाचे काय..?
जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये बीजबील भरताना शिक्षक तसेच पालकांची दमछाक होत आहे. जिल्हा परिषदेने आपल्या २४५१ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांची मागणी जिल्हा नियोजनकडे केली आहे. त्यापैकी ४ कोटी रुपये मंजूर झाल्याने पहिल्या टप्प्यात ७०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार आहेत. परंतु आता सीसीटीव्ही बसतील, पण वीजबिलाचे काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 15/Apr/2025