रत्नागिरी : चाफेरी कासारी सांडेलावगण रस्त्याच्या कामाबाबत आक्रमक झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी घेत रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात केली आहे.
१० एप्रिलपासून रस्त्यांवरील मोऱ्यांचे पाईप टाकण्यास सुरुवात झाली आहे, खडीकरणासाठी लागणारी खडी साईटवर गोळा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ एप्रिल रोजी करत असलेले आंदोलन स्थगित करण्याची विनंती कार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे केली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण अंतर्गत रस्ता सन २०२२ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. ६.३७ किलोमीटर अंतराचा हा रस्ता असून याठिकाणी सुमारे २ हजार ५०० लोकवस्ती आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होण्याचा कालावधी १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत होता. मात्र संबंधित ठेकेदाराने २०२४मे महिन्याच्या शेवटी रस्ता रुंदीकरणाचे काम चालू केले. त्यानंतर पावसाळ्यात काम बंद होते, नोव्हेंबर महिन्यात पाऊस गेल्यानंतर आज अखेरपर्यंत या ठेकेदाराने पुढील काम चालू केलेले नाही.
याबाबत चाफेरी गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याबाबत विचारणा केली होती; मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. याची कैफियत चाफेरी ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मांडली होती. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनही सादर केले होते. तसेच रस्ता लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ग्रामस्थांसह १५ एप्रिल रोजी आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला होता.
सद्यस्थितीत या रस्त्याच्या कामावर १० एप्रिलपासून मोऱ्यांचे पाईप टाकण्यास सुरुवात केलेली आहे व खडीकरणासाठी लागणारी खडी साईटवर गोळा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आलेल्या आहेत. तरी १५ एप्रिल रोजी करत असलेले आंदोलन स्थगित करून या कार्यालयास सहकार्य करावे ही विनंती, असे या पत्रात नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 15/Apr/2025














