रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षेत (२०२४) कृषी सेवेच्या पदाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवेतील २५८ पदे ही राज्यसेवेच्या परीक्षेत समाविष्ट झाली आहेत. त्या जागांसाठी उमेदवारांना १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांच्या भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदांचा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये समावेश करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र ही मागणी मान्य होत नसल्याने स्पर्धा परीक्षार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने नियोजित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली.
त्यानंतर एमपीएससीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी होणार आहे.
पदनिहाय रिक्त संख्या
कृषी सेवेतील २५८ पदांमध्ये कृषी उपसंचालक पदाच्या ४८, तालुका कृषी अधिकारी तथा तंत्र अधिकारी पदाच्या ५३, कृषी अधिकारी, कनिष्ठ व पदांच्या १५७ अशा एकूण २५८ पदाचा समावेश आहे. या पदांच्या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण यांचा तपशील एमपीएससीने जाहीर केले आहे.
या उमेदवारांना कृषी सेवेचा पर्याय
नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेसाठी अर्ज करता येईल. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार कृषी सेवेसाठी पात्र ठरणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांना कृषी सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आरक्षणानुसार वयोमर्यादा
खुल्या गटासाठी कमाल वयोमर्यादा ३८, मागासवर्गीय गटासाठी ४३, माजी सैनिक गटासाठी ४३ आणि दिव्यांग गटातील उमेदवारांसाठी ४५ इतकी वयोमर्यादा आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार देखील पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. मात्र, मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 08/Oct/2024