रत्नागिरी : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सरकारच्या तिजोरीवर ताण देणारी ठरत आहे. अनेक विकासकामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली. छाननीमध्ये जिल्ह्यातील ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. मार्चपासून या योजनेचा लाभमिळणार नाही. त्यामुळे सरकारचे एक कोटी १६ लाख २९ हजार ५०० रुपये वाचणार आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. पात्र महिलांकडून अर्ज मागविले. दरमहा १५०० रुपये मानधन या योजनेतून लाभार्थी महिलांना दिले जाते; मात्र या योजनेवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलणे राज्याच्या तिजोरीला शक्य नसल्याची जाणीव निवडणूक संपताच झाली. अनेक योजनांना त्यामुळे कपातीचा फटका बसला. यामुळे राज्याचे आर्थिक गणितच कोलमडले. यातून सावरण्यासाठी शासनाने योजनेच्या लाभार्थीची छाननी सुरू केली. अनेक अटी होत्या. त्यांचे उल्लंघन करून ज्यांनी अन्य योजनेचा लाभ घेतला अशा एक-दोन नव्हे, तर ७ हजार ७५३ लाडक्या बहिणी जिल्ह्यात आढळल्या. त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ( Ladki Bahin Yojana )
काही बहिणी अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनाही वगळले. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेणाऱ्या २ हजार ७६२ महिला आढळल्या. चारचाकी असलेल्या १ हजार ३५० बहिणी आढळल्या. ६५ वर्षांवरील १ हजार ३८७ बहिणी लाभ घेताना आढळल्या. अनेक नव्या शेतकरी योजनांच्या लाभार्थी २ हजार २५४ लाभार्थी महिला आढळल्या. ( Ladki Bahin Yojana )
एकूण जिल्ह्यात ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यांना आता लाभ मिळणार नाही. उर्वरित बहिणींना आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल. ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत हे कार्ड लिंक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Ladki Bahin Yojana )
याकरिता ४ लाख १२ हजार ७७४ इतक्या लाभार्थी होत्या. यातील ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सरकारचे १ कोटी १६ लाख २९ हजार ५०० रुपये वाचले आहेत. ( Ladki Bahin Yojana )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 PM 15/Apr/2025
