प्राथमिक शिक्षकांना दिलेली आश्वासने पूर्ण करू : पालकमंत्री उदय सामंत

दापोली : प्राथमिक शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यांना जे जे आश्वासन देऊ ते ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द मंत्री उदय सामंत यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोकण विभागाच्यावतीने कोकण विभाग शिक्षक समितीचा मेळावा व शिक्षण परिषदेमध्ये ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, आजपर्यंत समिती जिथे जिथे बोलावते, तिथे तिथे मी स्वतः जातीने हजर असतो. प्राथमिक शिक्षण हा पाया असून, मुलांच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण करणारी अशैक्षणिक कामे लादू नयेत, या मताचा मी आहे. तसेच संचमान्यता असो वा सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध आहे. मंत्री योगेश कदम यांनीही शासकीय कर्मचारी अनिच्छेने कधीच काम करीत नसतात.

शिक्षकांची इच्छा असूनही अशैक्षणिक कामांमुळे त्यांच्या मूलभूत कामात अडथळे येतात. शासन आणि प्रशासन एकत्र येऊन तणावमुक्त काम केल्यास सुशासन राहील. कोकण विभागासाठी डोंगरी निकष कसे लागू होतील यासाठी प्रयत्नशील राहू आणि विविध मागण्यांसंदर्भात राज्य शिक्षक समितीच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचे सांगितले.

सर्व प्राथमिक शिक्षकांनी एकत्र या
जुनी पेन्शन महायुतीचंच सरकार देऊ शकतं. यासाठी सर्व प्राथमिक शिक्षकांनी एकत्र आले पाहिजे. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्यासोबत एक बैठक घेऊन मागण्यांना न्याय देण्याचं काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी शासनामार्फत दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 15/Apr/2025