दापोली : महाराष्ट्रातील मराठी माध्यमाची प्राथमिक अथवा माध्यमिकची एकही शाळा बंद पडू देणार नाही. त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे. मी जरी शांत वाटत असलो, तरी वेळप्रसंगी रौद्ररूप दाखवायला कमी करणार नाही, असे प्रतिपादन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. तसेच नवीन संचमान्यतेनुसार कोकणामधील ज्या शाळांना फटका बसणार आहे, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपययोजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या ६३ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे अधिवेशन दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात झाले. या प्रसंगी सुनील पंडित, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, शाळांना टप्पा अनुदान मिळावे यासाठी मी विशेष प्रयत्न करीत आहे. विनाअनुदानित शिक्षक बांधवांना अनुदान मिळण्यासाठी आमचे सरकार नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देईल. सरकारची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असून, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडक्या बहिणींचा विचार जसे आपले सरकार करीत आहे, तसाच विचार विद्यार्थी आणि शिक्षकांचाही करीत आहोत. नवीन संचमान्यतेनुसार कोकणामधील ज्या शाळांना फटका बसणार आहे, त्यावर योग्य उपाययोजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आखल्या जातील.
मुख्याध्यापक महामंडळाने पत्र द्यावे, त्याचा पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या निर्णयामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यावर होणारा परिणाम याकडे लक्ष वेधले. अधिवेशनाच्या सुरुवातीला सुनील पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर महाराष्ट्रात सीबीएससी पॅटर्न केंद्रीय व राज्य शिक्षक मंडळ तुलनात्मक अभ्यास यावर कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने निबंध सादर केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 15/Apr/2025














