रत्नागिरी : मालगुंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्मिता दुर्गवळी यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी ग्रा. पं. सदस्या स्मिता संजय दुर्गवळी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. मालगुंड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) वर्चस्व आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली सत्ता या ग्रामपंचायतीवर अबाधित राखली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर निवडून जाणाऱ्या सदस्यांना ठाकरे गटाकडून उपसरपंचपदावर बसण्याचा बहुमान ठरवून दिला जातो. तसेच ठाकरे गटाकडून निवडून येणाऱ्या प्रत्येक समाजातील उमेदवाराला ग्रामपंचायतीच्या महत्त्वाच्या पदावर बहुमान देण्याचा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून घेतला जात आहे. त्यातूनच आता प्रत्येक समाजातील सदस्य उमेदवाराला महत्त्वाच्या पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळत आहे. त्यामुळे मालगुंडमधील सर्वच समाजातील ग्रामस्थांकडून विशेष समाधान व्यक्त केले जात आहे.

एकूणच मालगुंडमध्ये असलेल्या चार प्रभागांमधून ग्रामपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकूण तीन ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंच पदाचा मान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वप्रथम प्रभाग क्रमांक चार मधून उपसरपंच पदी संतोष दत्ताराम चौगुले यांना पहिल्यांदा उपसरपंच पदी बसवण्याचा बहुमान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिला. त्यानंतर त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्यांदा कुणबी समाजाचा उमेदवार म्हणून नवनिर्वाचित उपसरपंचपदी प्रभाग क्रमांक एक मधील महिला ग्रामपंचायत सदस्या स्मिता दुर्गवळी यांना बसविण्याचा निर्णय पक्षीय निर्णयानुसार तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया मालगुंड ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पाडली.

यावेळी सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणूक प्रक्रिये प्रसंगी विरोधी पक्षाच्या एकाही ग्रामपंचायत सदस्याकडून उपसरपंच पदासाठी अर्ज (नामनिर्देशन पत्र) सादर न झाल्याने स्मिता दुर्गवळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ही बिनविरोध निवडी प्रक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदाच्या खुर्चीत स्मिता दुर्गवळी यांना मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता घेऊन व त्यांच्या सहकारी सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य यांचे वतीने विराजमान करून त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 08/Oct/2024