Gold Price Today: अक्षय्य तृतीयेला सोनं 1 लाखांचा टप्पा ओलांडणार? 

Gold Price Today नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात टॅरिफ वॉरवरुन अमेरिका आणि चीनमध्ये वार पलटवार सुरु आहेत. टॅरिफ वॉरच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. साडेतीन महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 93350 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचे दर 96000 रुपयांवर पोहोचले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गोल्ड फ्यूचर्सचे उच्चांकी दर 93340 रुपयांवर होते. अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ होतेय. कारण, गुंतवणकूदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 91110 रुपये इतकी आहे. 20 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 83080 रुपये इतके आहेत. 18 कॅरेट सोन्याचेदर 75620 रुपये तर 14 कॅरेट सोन्याचे दर 60210 रुपयांवर आहेत. 2025 मध्ये साडेतीन महिन्यात सोन्याच्या दरात साधारणपणे 20 टक्क्यांची वाढ झाली असून एक तोळा सोन्याचे दर 16 हजार रुपयांनी वाढले आहेत.

सोनं एक लाखांचा टप्पा पार करणार?

सोने खरेदी विक्री क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार 30 एप्रिलला अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर जाऊ शकतात. एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सीचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी यांच्या हवाल्यानं इकोनॉमिक्स टाइम्सनं सोन्याचा सपोर्ट लेव्हल 92000 नुसार सध्या दर 94500 ते 95000 दरम्यान आहे. मात्र, त्यांनी स्पष्टपणे सोन्याचे दर 1 लाखांच्या पार जातील की नाही हे सांगितलं नाही.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजापेक्षा जास्त सोन्याची खरेदी होत आहे. कॉमेक्सवर सोन्याचे दर 3240 ते 3260 डॉलर प्रति औंस दरम्यान आहेत. तर भारतात 10 ग्रॅम सोन्याचे दर 92000 ते 94000 रुपयांदरम्यान आहेत.

बाजारातील अस्थिरतेमुळं सोन्याचे दर वाढले

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी हेड आणि विश्लेषक अनुज गुप्ता यांच्या हवाल्यानं इकोनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करतील, असं म्हणणं अतिघाईचं ठरेल.

गुंतवणूकदार फायद्यात पण ग्राहकांची अडचण

भारतात सोन्याच्या दागिन्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. विविध सणांच्या काळात सोने खरेदीला प्राधान्य दिलं जातं. लग्नसराईमुळं देखील सोन्याची मागणी वाढलेली असते. या कालावधीत सोन्याचे दर वाढले आहेत. 2025 मधील साडेतीन महिन्यात सोन्याचे दर 16 हजारांनी वाढल्यानं गुंतवणूकदारांचा फायदा झालाय. तर, सोने खरेदी करणाऱ्यांची मात्र यामुळं अडचण होत असल्यानं त्याचा परिणाम सोने विक्रेत्यांच्या उलाढालीवर झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 15-04-2025