सुनेशी झालेल्या वादाची पोलिसात तक्रार होण्याच्या भीतीने सासऱ्याची आत्महत्या

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथे एका कौटुंबिक वादातून दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या नशेत सुनेबरोबर झालेल्या वादाची आणि तिच्यावर सुरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात जाईल, या भीतीने ५९ वर्षीय सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिल सखाराम मोहिते असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, असावे बौद्धवाडी येथील रहिवासी सुनिल सखाराम मोहिते (वय ५९) हे मद्यपी होते. त्यांनी रविवारी, १३ एप्रिल रोजी रात्री मद्यपान करून त्यांची सून सौ. निकिता निकेश मोहिते हिच्याबरोबर वाद घातला. वाद वाढत गेल्यानंतर, रागाच्या भरात त्यांनी घरातील भाजी कापण्याची सुरी हातात घेऊन सुनेच्या अंगावर मारण्यासाठी धाव घेतली. यावेळी झालेल्या झटापटीत सुरीचे टोक निकिता यांच्या गालाला लागून त्यांना ओरखडा आला.

या घटनेनंतर निकिता आणि त्यांचे पती निकेश (सुनील यांचा मुलगा) हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार होते. आपण केलेल्या कृत्याची तक्रार पोलिसात जाईल आणि आपल्यावर कारवाई होईल, या भीतीने सुनिल मोहिते यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी रविवारी रात्री ११:३० ते सोमवारी, १४ एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान घरासमोरील पडवीतील लाकडी वाशाला लोखंडी केबल अडकवून स्वतःच्या मानेला गळफास घेत आत्महत्या केली.

या दुर्दैवी घटनेप्रकरणी मयत सुनिल मोहिते यांचा मुलगा निकेत सुनिल मोहिते यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची नोंद करण्यात आली असून, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली माखजन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 15/Apr/2025