Monsoon Prediction : देशात यंदाचा पावसाळा होणार दमदार! ‘स्कायमेट’चा अंदाज

नागपूर : देशात यंदा दमदार पाऊस बरसणार असून, मान्सूनचा हंगाम सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेट या हवामानविषयक अंदाज वर्तविणाऱ्या खासगी संस्थेने वर्तविला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ८६८.८ मीलीमीटर म्हणजेच सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होईल, असाही अंदाज आहे.

स्कायमेटने जाहीर केलेल्या अंदाजात मान्सूनवर विपरित परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाकारली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये ला निनो कमजोर असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. ला निनो कमकुवत असल्यास आणि एल निनोचा प्रभाव नसेल, तर मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत असतो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असेही स्कायमेटने म्हटले आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा तर पश्चिम घाटात म्हणजेच प्रामुख्याने केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्ये आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तविली आहे.

जूनमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के म्हणजेच १६५.३ मीमी, जुलैमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०२ टक्के म्हणजेच २८०.५ मीमी, ऑगस्टमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०८ टक्के म्हणजेच २५४.९ मीमी आणि सप्टेंबरमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०४ टक्के म्हणजेच १६७.९ मीमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे अंदाजात वर्तविले आहे.

हवामान विभागाने अद्याप जाहीर केला नाही पूर्वानुमान
स्कायमेट या खासगी संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असला, तरी भारतीय हवामान विभागाने २०२५ मधील मान्सूनचे पूर्वानुमान अद्याप जाहीर केलेले नाही. विभागाकडून साधारणतः मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला अंदाज जाहीर केला जातो, परंतु या वर्षी एल निनोची स्थिती ‘न्यूट्रल’ राहाण्याची शक्यता असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे मान्सून सामान्य राहाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मात्र मान्सूनबाबत आताच भाकीत करणे घाईचे ठरेल, असे स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 15-04-2025