चिपळूण : चिपळूण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मुझफ्फर खान यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यासोबतच महेंद्र कासेकर यांची उपाध्यक्ष, सुभाष कदम यांची सचिव आणि समीर जाधव यांची खजिनदार म्हणून निवड झाली आहे.
चिपळूणमधील प्रिंट मीडियामध्ये कार्यरत पत्रकारांनी एकत्र येऊन चिपळूण पत्रकार संघ स्थापन केला आहे. ही संघटना पूर्णपणे कायदेशीर आणि नोंदणीकृत असून, शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. शासन मान्यता असलेल्या दैनिकांत काम करणारे सर्व श्रमिक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत. पत्रकारांच्या विविध समस्यांचे निराकरण, आरोग्य आणि विमा संरक्षण, तज्ज्ञांचे अभ्यासवर्ग आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
चिपळूण येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर आज सकाळी पत्रकार संघाची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत मावळते अध्यक्ष नागेश पाटील यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर केला. संघटनेच्या जमाखर्चाचा तपशीलही त्यांनी मांडला. संदीप बांद्रे यांनी सांगितले की, पत्रकार संघाने राबवलेल्या सामाजिक आणि विधायक उपक्रमांमुळे समाजात संघटनेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
राजेंद्र शिंदे यांनी यावेळी सांगितले की, प्रिंट मीडियामधील सर्व पत्रकार एका कुटुंबासारखे आहेत. यापुढेही सर्वांनी एकजुटीने राहून एकमेकांच्या अडचणी सोडवाव्यात आणि समाजाला अपेक्षित पत्रकारिता करावी. समीर जाधव यांनी समाजाला अपेक्षित उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली, तर राजेश जाधव यांनी चिपळूणच्या विकासाला दिशा देणारे लिखाण आणि पत्रकारांच्या हिताचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
बैठकीत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली, जी पुढील एक वर्षासाठी कार्यरत राहील. नूतन अध्यक्ष मुझफ्फर खान यांनी पत्रकारांच्या हितासाठी एकजुटीने काम करण्याची ग्वाही दिली. पत्रकारांना शासनाच्या योजनांचा लाभ, विमा संरक्षण आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला संतोष सावर्डेकर, संतष कुळे, सुनील दाभोळे, राजेश कांबळे, सुशांत कांबळे, गौरव तांबे यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 16-04-2025














