क्रेडाई रत्नागिरीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हॉटेल विवा येथे संपन्न

रत्नागिरी, १६ एप्रिल २०२५ : क्रेडाई रत्नागिरी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या २०२५-२७ या कार्यकाळासाठी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आज बुधवार, दि. १६ एप्रिल २०२५ रोजी हॉटेल विवा, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यास क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल तावरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यासोबत क्रेडाई महाराष्ट्राचे खजिनदार श्री. सुरेंद्र भोईते, टाऊन प्लानिंग नगररचनाकार श्री. ज्ञानु माने, मुख्याधिकारी नगरपरिषद श्री. तुषार बाबर, श्रीम. स्मिता कलकुटी आणि क्रेडाई चिपळूण अध्यक्ष श्री. शकील चौगुले यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

नूतन पदाधिकारी आणि सत्कार

या कार्यकाळासाठी श्री. महेश गुंदेचा यांनी अध्यक्षपद, श्री. प्रदीप कट्टे यांनी सचिवपद आणि श्री. महावीर जैन यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते अध्यक्ष श्री. नित्यानंद भुते यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना पदभार सोपवत मागील दोन वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा सादर केला. यावेळी श्री. प्रफुल्ल तावरे यांनी शुभेच्छापर भाषणात क्रेडाई रत्नागिरीला कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात क्रेडाई रत्नागिरीचे माजी अध्यक्ष श्री. दिपक साळवी यांची क्रेडाई महाराष्ट्र सह-संयोजकपदी, तसेच क्रेडाई बोर्ड मेंबर श्री. राजेश शेट्ये यांची सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कोकण प्रदेश उपप्रमुखपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. नवीन टाऊन प्लानिंग नगररचनाकार श्री. ज्ञानु माने यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

युथ विंग आणि नवसभासदांचे स्वागत

क्रेडाई रत्नागिरीच्या २०२५-२७ कार्यकाळासाठी युथ विंग संयोजकपदी श्री. राहुल भोसले आणि सह-संयोजकपदी श्री. वरुण वालावलकर यांची निवड झाली. तसेच, मागील दोन वर्षांत संस्थेत नोंदणी झालेल्या नवीन सभासदांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रुपेश साळवी यांनी केले, तर नूतन उपाध्यक्ष श्री. प्रवीण जैन यांनी आभारप्रदर्शन केले. दिनेश जैन, आनंद चौगुले, मिथुन मणियार, प्रवीण लाड आणि संस्थेच्या सभासदांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.