चिपळूण : कोकणात केरळच्या धर्तीवर जल पर्यटन विकास करण्यासाठी हाऊस बोट उपक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत जिल्ह्यातील रत्नागिरीसह चिपळूण, गुहागर, दापोली या ठिकाणी पाच हाऊस बोट दाखल झाल्या आहेत. बुधवारी (दि. १६) चिपळूणच्या गोवळकोट धक्क्यावर चिपळूण तालुक्यासाठी एक अत्याधुनिक सर्वसुविधांयुक्त हाऊस बोट दाखल झाली आहे.
आ. शेखर निकम यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे येत्या आठ दिवसांत चिपळूणसाठीच्या हाऊस बोटीचा प्रारंभ होणार आहे. हाऊस बोटीच्या माध्यमातून चिपळुणातील बॅकवॉटर पर्यटनास चालना मिळणार आहे.
कोकणला केरळपासून गोव्यापर्यंतचा ७२० कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामध्ये मुख्यत्वे अर्ध्याहून अधिक समुद्रकिनारा हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांच्या वाट्याला आला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास व्हावा, यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कोकण म्हटले की, समुद्र, खाड्या, नदी याचबरोबर उंच-उंच डोंगर व घनदाट झाडी,
विविध प्रकारचे वन्यजीव, पक्षी यांचा खजिनाच आहे. त्याचबरोबर कोकणी रानमेवा अर्थातच तोरणं, आटकं, करवंद, जांभूळ, अळू, काजू, आंबा, फणस, साखरजाम अशा अवीट गोडी असलेली नैसर्गिक फळे त्याचप्रमाणे खवय्यांचे आवडते मासे हे सगळे अनुभवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची पावले आता कोकणाकडे वळू लागली आहेत. अथांग समुद्रकिनारा, नीळ्याशार खाड्या आणि चोवीस तास प्रवाहित नद्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये आहे. केरळ राज्यात जल पर्यटनातून वर्षाला कोट्यवधी रूपयांची उलाढाल खाडी व नदीतील जल पर्यटनातून होते. आता असेच नियोजन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोकणच्या भूमीत शासनाच्या माध्यमातून सुरू झाले आहे.
आमदार शेखर निकम यांनी चिपळूण तालुक्यात केरळच्या जल पर्यटनाच्या धर्तीवर असलेली भौगोलिक परिस्थितीनुसार अत्याधुनिक हाऊस बोट उपलब्ध करून दिली आहे. मूळ रत्नागिरीतील असलेले राजेश देसाई यांच्या इन्स्पिरेशन मरीन कंपनीने या हाऊस बोटची बांधणी केली आहे.
अत्याधुनिक असलेल्या हाऊस बोटीमध्ये जल पर्यटन सफारीसाठी तीन, पाच व चोवीस तास अशा पॅकेजची संकल्पना आहे. ही हाऊस बोट मालदोली येथील महिला बचत गटाच्या माध्यमातून चालविली जाणार आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अग्नीपंख महिला बचत गटाकडून जल पर्यटनाचे नियोजन करण्यात येत आहे. हाऊस बोटमध्ये अत्याधुनिक निवास व्यवस्थेसह एकूण दोन कुटुंबे अर्थात बारा माणसे चोवीस तासांच्या पॅकेजमध्ये वास्तव्य करू शकतात. सोबत दोन खलाशी, एक इंजिनिअर व बोट चालक यांची व्यवस्था आहे.
स्वतंत्र दोन खोल्यांमधून दोन कुटुंबातील बारा माणसांसाठी निवास व्यवस्था तसेच बोटीच्या टेरेसवर भोजन व्यवस्था असे नियोजन या हाऊस बोटमध्ये करण्यात आले आहे. आधुनिक वॉशरूमसह वातानुकूलीन यंत्रणेने सुसज्ज असलेली हाऊस बोट तीन पॅकेजमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. गोवळकोट बंदर धक्का ते मालदोली, चिवेली बंदर धक्का या टापूमध्ये ही हाऊस बोट या तीन पॅकेजमध्ये पर्यटकांना घेऊन फिरणार आहे. दरम्यानच्या काळात या टापूतील विविध बेटे, कृषी पर्यटन असलेली ठिकाणी या ठिकाणी हाऊस बोट धक्क्यांवर थांबवून पर्यटकांना त्या परिसरात फिरविले जाणार आहे.
गोवळकोट ते दाभोळ खाडी दरम्यान अनेक छोटी-मोठी बेटे आहेत. या बेटांना ऐतिहासीक पार्श्वभूमी आहे. घनदाट जंगल असलेल्या या बेटांवर विविध प्रकारचे पक्षी व प्राणी आढळून येतात. प्रामुख्याने संपूर्ण गोवळकोट ते दाभोळ खाडीपट्टा हा मगरींसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे दुर्मीळ पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात.
या सर्व नैसर्गिक घटकांची अनुभूती पर्यटकांना हाऊस बोटच्या माध्यमातून मिळणार आहे. याचे सर्व श्रेय आमदार शेखर निकम यांना प्राधान्याने जाते. सध्या हाऊस बोटचे जलावतरण करण्यापूर्वी गोवळकोट धक्क्यावर या हाऊस बोटीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्राथमिक नियोजनामध्ये गोवळकोट धक्का ते मालदोली, चिवेली बंदर दरम्यान फेरीच्या माध्यमातून पर्यटकांचे विविध ठिकाणचे थांबे आणि पर्यटनस्थळांची पॅकेजनुसार असलेली ठिकाणी यांची पाहणी करून येत्या आठ ते दहा दिवसांत हाऊस बोटचा शुभारंभ होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 17/Apr/2025














