रत्नागिरी : जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर केली असून, त्या यादीवरील काही आक्षेप निकाली काढण्यात येत आहेत. शिक्षकांच्या माहितीचा ऑनलाईन डेटा तयार झाला असून, बदलीपूर्व प्रक्रियेला वेग आला आहे.
तीन वर्षापेक्षा अधिक काळ अवघड अर्थात दुर्गम क्षेत्रातील शाळांमध्ये सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या सुगम भागातील शाळांवर बदल्या करण्यात येणार आहेत. नऊ तालुके मिळून जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ३८४ शाळा असून यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सुमारे सहा हजार शिक्षक कार्यरत आहेत.
शासनाच्या नियमानुसार, ज्या नियमित शिक्षकांची तीन वर्षांची सेवा अवघड क्षेत्रात पूर्ण झाली, अशा शिक्षकांना साधारण अर्थातच सुगम क्षेत्रात सेवा देण्याची संधी उपलब्ध केली जाते. त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रक्रिया राबविली जाते. बदली प्रक्रियेसाठी सर्व शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर बदली पात्र शिक्षकांची यादी तयार होणार आहे. या यादीवर आक्षेप आले तरी त्याचा निपटारा शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे. सुगम व अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीवर जवळपास ९० शिक्षकांनी आक्षेप घेतले होते. त्या आक्षेपाचा प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने निपटारा करण्यात आला, काही आक्षेप स्वीकारण्यात आले, तर काही आक्षेप शिक्षण विभागाकडून फेटाळून लावण्यात आले आहेत.
प्रक्रिया ३१ मे पूर्वी होणार
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी शासनाच्या बदली प्रक्रियेच्या ऑनलाईन पोर्टलवर आपली संपूर्ण माहिती भरली असून, शिक्षकांनी पोर्टलवर भरलेली माहिती संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली आहे. ज्यांच्या माहितीमध्ये चुका होत्या तसेच अपूर्ण होती, ती पूर्ण करून घेण्यात आली. या पोर्टलद्वारे ऑनलाइन बदल्या करण्यात येणार आहेत. बदलीची सर्व प्रक्रिया ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 17/Apr/2025














