चिपळूण आगारातून ८१० जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

चिपळूण : उन्हाळ्यातील सुट्यांचे सर्वांनाच वेध लागले आहेत. चिपळूणमधून परजिल्ह्यात जाणाऱ्यांसाठी एसटी आगाराने जय्यत तयारी केली आहे. नियमित फेऱ्या वगळता सुमारे ८१० फेऱ्या चिपळूण आगारातून वेगवेगळ्या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवास सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना कमी खर्चात करता येणार आहे.

सध्या परीक्षेचा हंगाम सुरू आहे. त्यानंतर सुटीचा हंगाम सुरू होईल. या हंगामात उत्पन्न वाढवण्यासाठी चिपळूण आगारात जय्यत तयारी सुरू आहे. एसटीच्या बस अनेक बंद पडतात. त्यामुळे प्रवासी लांबचा प्रवास एसटीने करणे टाळतात. त्यामुळे चिपळूण आगारात सध्या जुन्या बसची दुरूस्ती सुरू आहे.

चिपळूण आगारातून सध्या पुणे, मुंबई, ठाणे, नालासोपारा, बोरिवली, बारामती, बेळगाव, परळी, बारातमी, बीड, कोल्हापूर, सांगली, मिरज, सावंतवाडी आदी मार्गावर एसटी धावतात त्याशिवाय जिल्ह्यांतर्गत एसटीच्या फेऱ्या सोडल्या जातात. त्या वगळता अन्य कोणत्या मार्गावर फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. जादा उत्पन्न कोणत्या मार्गावरून मिळाले याचे विचार करून यावर्षीचे वेळापत्रक बनवले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘लालपरी’तून आपल्या गावाला जाता येणार आहे. एसटीच्या या निर्णयामुळे लहान मुलांना मामाच्या गावाला तर जाता येईलच; पण पर्यटनाचादेखील आनंद लुटता येणार आहे. ज्यांना रेल्वेचे तिकीट मिळत नाही, रेल्वेच्या कोंडीतून प्रवास करणे शक्य होत नाही, अशा प्रवाशांना एसटीतून आरामदायी प्रवास करता येणार आहे.

उन्हाळ्यात चिपळूण आगाराचे उत्पन्न वाढवणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा हंगाम संपल्यानंतर आम्ही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. जादा उन्हाळी बस सोडण्यासाठी जादा बसची मागणीसुद्धा करण्यात आली आहे. जून महिन्यापर्यंत उन्हाळी बस सोडण्यात येणार आहेत- दीपक चव्हाण, आगारप्रमुख चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 17/Apr/2025