Ratnagiri : पानवल धरणाचे मजबुतीकरण युद्धपातळीवर..

रत्नागिरी : नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटी) शहराला पाणी पुरवणारे पानवल धरण पावसाळ्यानंतर रत्नागिरीकरांची जादा पाण्याची तहान भागवण्यास सज्ज होणार आहे. ६० वर्षांमध्ये एकदाही दुरुस्तीचा विचार न झालेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीला पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे २० कोटींचा निधी मिळाला आहे.

या धरणाचे मजबुतीकरण आणि गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ०.३४१ दलघमी इतकी होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र स्मार्ट सिटीअंतर्गत २०.६९ कोटींचा निधी पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी मंजूर झाला. हे काम रत्नागिरी पाटबंधारे विभागमार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारे हे काम सुरू झाले आहे.

शहराला पालिकेच्या मालकीचे पानवल धरण व जलसंपदा विभागाचे शीळ धरण या दोन धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरणाचे बांधकाम १९६२ मध्ये झाले आहे. धरणास ६२ वर्षे पूर्ण झाल्याने ते पूर्णतः मोडकळीस आले आहे. धरण दुरुस्तीसाठी २००८ पासून मंत्री उदय सामंत प्रयत्न करत होते.

दगडी बांधकाम असल्याने धरणास मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यामुळे सांडव्याचे व पक्षभिंतीचे दगड निखळून पडलेले आहेत. या धरणाची दुरुस्ती करण्यासाठी दगडी सांडव्यास सिमेंट ग्राऊटिंग करणे दोन्ही बाजूस संधानकात अस्तरीकरण करणे, स्टिलिंग बेसिनची नव्याने उभारणी करणे, विमोचकाकडे जाणेकरिता पोहोच रस्ता आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पानवल धरणाची दुरुस्ती होऊन जादा पाण्याची गरज भागविण्यास मदत होणार आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळवीर सुरू आहे. ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने कामाला गती देण्यात आली आहे – जी. एच. सलगर, पाटबंधारे विभाग अधिकारी

दिवस-रात्र काम सुरू
निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरकडून कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. ३१ मेपूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने दिवस-रात्र काम सुरू ठेवण्यात आले आहे. दगडी सांडव्यास सिमेंट ग्राऊटिंग करण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. अंतर्गत भागातून गळती थांबविण्यासाठी देखील मजबूत उपाययोजना करण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 17/Apr/2025