मधमाशी पालनाकडे संशोधन दृष्टीने पाहावे : डॉ. संतोष वानखेडे

रत्नागिरी : मधमाशी पालनाकडे युवकांनी संशोधन दृष्टिकोनाने वळावे, व्यवसाय म्हणून याचा विचार करावा. या विषयी अनेक पद्धतीने संशोधन व नव्या प्रजातींचा शोध सुरू आहे, असे प्रतिपादन भाट्ये नारळ संशोधन केंद्रातील सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे बोलत होते.

भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रामध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. वानखेडे बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मधमाशी पालन या क्षेत्रासंबंधी महाराष्ट्रातील संशोधन, चालू घडामोडी त्याचबरोबर मधमाशीच्या प्रजाती याची माहिती दिली. विविध जातींनुसार व्यवसायाला होणारा फायदा स्पष्ट केला.

क्षेत्रभेटीवेळी आसपासच्या परिसरातील त्यांनी तयार केलेले संच दाखवून त्याची रचना सांगितली. त्यांनी स्वतः संरक्षक कीट घालून मधमाशी संच उघडून दाखवला व प्रत्येक भागाचे नाव व महत्त्व सांगितले. काही इच्छुक विद्यार्थ्यांनी हे कीट घालून त्यांच्यासमोर प्रात्यक्षिकदेखील केले. त्यांनी मधमाशीचे जीवनचक्र, अंड्यापासून ते नर, राणी माशी, कामगार माशी असे होणारे रूपांतर याचा व्यवसायात कसा विचार करावा, याचे मार्गदर्शन केले.

क्षेत्रभेटीच्या अखेरीस नारळासंबंधित मित्र कीटकांविषयी प्रयोगशाळेत चालणारे काम त्यांनी दाखवले. भविष्यात याचा व्यवसाय म्हणून विचार करताना योग्य असे प्रशिक्षण घेऊनच सुरुवात करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. प्रश्नांचे डॉ. वानखेडे यांनी निवारण केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 18/Apr/2025