चिपळूण : पाचाडमधील पाझर तलाव ठरतोय निरूपयोगी; ग्रामस्थांचे १ मे रोजी उपोषण

चिपळूण : तालुक्यातील पाचाड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या चिलनी ठिकाणी सुमारे २५ वर्षांपूर्वी बांधलेला पाझर तलाव निरूपयोगी झाला आहे. त्याचे काम कुठल्या विभागाने केले व देखभालीची जबाबदारी कुणाकडे आहे, याबाबत अद्यापपर्यंत स्पष्टता न झाल्याने तसेच या तलावाचे काम तातडीने करून परिसरातील ग्रामस्थांना त्याचा वापर होण्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला आहे.

पाचाड ग्रा. पं. हद्दीमध्ये चिलनी या नावाने ओळख असलेल्या भागात १९९४-९५ मध्ये पाझर तलाव बांधण्यात आला. त्यासाठी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या जमिनी शासनाने घेतल्या. मात्र, सुमारे २५ वर्षांपूर्वी बांधलेला पाझर तलाव त्या वेळेपासून आजपर्यंत सुस्थितीत नसल्याने व पूर्ण न झाल्याने त्याचा वापर होत नाही. तसेच तलावात वरील कालावधीत पाणीसाठा होऊ शकला नाही. गावामध्ये पाण्याचे कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक स्रोत नाहीत, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांसह शेतकरी, दुभती जनावरे तसेच नैसर्गिक वन्यजीवांना पाण्यावाचून हाल सोसावे लागत आहेत. गावात पाण्यासाठी पाचाड ग्रा. पं. मार्फत कळवंडे येथील विहिरीतून सुमारे तीन कि.मी. अंतरावरून पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने ग्रामस्थांसह पशुधनाची तहान भागत नाही, शासनाकडे पाणीपुरवठा संदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 19/Apr/2025