T20 Mumbai League Rohit Sharma : सध्या भारतात आयपीएल 2025 चा थरार रंगला आहे. केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील खेळाडू या हंगामात खेळण्यासाठी येतात. दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) भारताचा कर्णधार रोहित शर्माला टी-20 मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामाचा चेहरा (face of the league) म्हणून घोषित केले आहे.
या लीगचा तिसरा हंगाम 25 मे पासून सुरू होणार आहे. ही घोषणा मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक, तसेच अपेक्स कौन्सिल आणि लीग गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य तसेच संघ चालक उपस्थित होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनात ही लीग सहा वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा परतत आहे आणि तिसऱ्या हंगामाला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामध्ये 2800 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ही लीग मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेट प्रतिभेसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून किती महत्त्वाची आहे, हे यावरून स्पष्ट होते. भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार बनलेला रोहित शर्मा हा मुंबईच्या समृद्ध क्रिकेट वारशाचा परिपूर्ण प्रतीक आहे. स्थानिक मैदानांपासून जागतिक स्तरापर्यंतचा त्याचा प्रवास आजही जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देतो आणि मुंबई क्रिकेटची ओळख ठरणाऱ्या प्रतिभा व जिद्देचा ठोस पुरावा आहे.
नवीन भूमिकेबाबत रोहित काय म्हणाला?
रोहित शर्मा म्हणाला की, भारतीय क्रिकेटच्या यशाचा पाया आपली घरगुती रचना नेहमीच राहिली आहे. टी-20 मुंबईसारख्या लीग त्या प्रवासात मोठी भूमिका बजावतात. या लीग नव्या प्रतिभेला उजाळा देतात आणि तरुण खेळाडूंना आवश्यक असा अनुभव मिळतो. मुंबईला एक समृद्ध क्रिकेट वारसा लाभलेला आहे आणि इथून काही अविश्वसनीय खेळाडू उदयास आले आहेत. ही लीग पुन्हा सुरू होत आहे हे पाहून खूप छान वाटतंय आणि याचा एक भाग बनणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी प्रत्येक तरुणाला हे संधीचं व्यासपीठ म्हणून पाहण्याचं आणि त्यावर आपली छाप सोडण्याचं आवाहन करतो. मला पूर्ण विश्वास आहे की सीझन 3 ही केवळ खेळाडूंसाठीच नव्हे, तर चाहत्यांसाठीही एक अविस्मरणीय अनुभूती ठरेल.”
रोहित शर्माने सांगितला सक्सेस मंत्र…
यासोबत रोहित शर्माने एक सक्सेस मंत्र सुद्धा सांगितला आहे. तो म्हणाला की, माझ्या लाईफमध्ये खूप चढउतार आले, पण माझं सक्सेस मंत्र एकच आहे. जे झाले आहे ते विसरून जा आणि पुढचा विचार करा. जर आपला एक दिवस खराब गेला तरी दुसरा दिवस आपला असतो. त्यामुळे आजचा दिवस विसरून जायचा दुसऱ्या दिवसासाठी तयार राहायचं. माझ्या वडिलांनी सांगितलं तुझ्या आयुष्यामध्ये खूप संधी येथील पण तुझ्यासाठी तयार पाहिजे.
“टी-20 मुंबई लीगसाठी रोहित शर्माची तिसऱ्या हंगामाचा चेहरा म्हणून घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि प्रवास मुंबई क्रिकेटच्या जिद्द, चिकाटी, मेहनत आणि महत्त्वाकांक्षा या मूलभूत मूल्यांचं प्रतीक आहे. त्यांचा लीगसोबतचा सहभाग केवळ युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देणार नाही, तर लीगची प्रतिष्ठाही वाढवेल. त्याचबरोबर टी-20 मुंबई लीग कुटुंबात दोन नवीन फ्रँचायझी चालकांचे स्वागत करताना आम्ही तितकेच उत्साहित आहोत. विविध भागधारकांकडून वाढत असलेल्या रसशीतून, आमचे उद्दिष्ट म्हणजे मुंबईतील प्रतिभावान खेळाडूंना आणखी मोठं व्यासपीठ देणं आणि भारताचे पुढचे क्रिकेट हिरो घडवणं,” असं मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 19-04-2025














