गुहागर : गुहागरच्या पर्यटन विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळवण्यासाठी नुकतीच ब्लू फ्लॅग बीच कमिटीने गुहागरला भेट दिली. या वेळी कमिटीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली आणि सध्या सुरू असलेले विविध उपक्रम तसेच येथील नैसर्गिक सौंदर्य पाहता हा किनारा मानांकनासाठी अत्यंत पोषक असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.
कमिटीने काही आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या असून, नगरपंचायत प्रशासन त्या पूर्ण करण्यासाठी आग्रही आहे. गुहागर शहराला लाभलेला सहा किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, सुरूच्या झाडांची सुखद सावली आणि येथील स्वच्छता यामुळे गुहागरचे पर्यटन जागतिक नकाशावर पोहोचण्यास मदत होणार आहे. यासाठी शहरवासीयांनीही सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे. लवकरच या मानांकनासाठी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळाल्यावर गुगल मॅपिंगमुळे विदेशी पर्यटकांची संख्या वाढेल आणि यामुळे पर्यटनाच्या विकासाच्या दिशेने एक मोठे आव्हान स्वीकारण्याची तयारी गुहागरवासियांनी दाखवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी ब्लू फ्लॅग बीच कमिटीचे नॅशनल ऑपरेटर श्रीजी कुरूप यांनी गुहागर समुद्रकिनारा, शहर आणि नगरपंचायतीला भेट दिली. पाहणीनंतर त्यांनी गुहागरचा समुद्रकिनारा राज्याचे पहिले मानांकन मिळवण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव विशाल मदाने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उत्कर्ष शिंगारे, वनविभागाचे सिद्धेश गायकवाड, तहसीलदार परीक्षित पाटील आणि मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण उपस्थित होते. श्रीजी कुरूप यांनी प्रशासनाबरोबरच शहरातील नागरिकांनाही या मानांकनाचे महत्त्व पटवून दिले. बैठकीत गुहागर पोलीस परेड मैदानाच्या मागील ६०० मीटर क्षेत्रफळाचा किनारा पहिल्या टप्प्यात मानांकनासाठी समाविष्ट करण्याची सूचना करण्यात आली.
या ६०० मीटर क्षेत्रात पार्किंगची सोय, १२ स्वच्छतागृहे (५ पुरुषांसाठी, ५ महिलांसाठी व २ दिव्यांगांसाठी), १२ स्नानगृहे, दररोज साफसफाई करणारे कर्मचारी, जीवरक्षक, सुरक्षित क्षेत्र, कचराकुंड्यांची व्यवस्था आणि स्थानिक उत्पादनांचे कोकणी खाद्यपदार्थ मिळण्याची जागा विकसित केली जाणार आहे. यासोबतच समुद्रकिनाऱ्यावर आरामखुर्चा व प्लास्टिकमुक्त क्षेत्र आणि वॉटर एटीएम व चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आहे, अशी माहिती कुरूप यांनी दिली. या मानांकनाबरोबरच गुहागरमध्ये पाच कोटी रुपयांचे सौरऊर्जा पथदीप उभारण्यासाठी मुख्याधिकारी प्रयत्नशील आहेत.
गुहागर नगरपंचायतीने सुरू ठेवलेले घनकचरा व्यवस्थापन, समुद्रकिनाऱ्याची नियमित स्वच्छता, कासव संवर्धन प्रकल्प आणि किनाऱ्याला जोडणारा चांगला रस्ता या मानांकनासाठी जमेच्या बाजू आहेत. मानांकनासाठी निश्चित केलेल्या क्षेत्रातील समुद्राच्या पाण्याची आणि हवेची तपासणी दर महिन्याला केली जाणार आहे. त्यामुळे मानांकनाचे ३४ निकष पूर्ण करण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाने सुरू केले आहे.
या पाहणीच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश थोरात, नगरपंचायतीचे प्रशासन अधिकारी अनंत मोरे, नगर अभियंता विजय भूतल, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, पाणीपुरवठा विभागाचे सचिन जाधव, शहर समन्वयक अक्षय सावंत आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 19/Apr/2025














