रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे सौंदर्य वाढावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी छोट्या रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शहराच्या खालच्या भागातील अंतर्गत रस्ते नवीन रस्त्यांनी जोडले जात आहेत. त्याचबरोबर जे जुने अरुंद रस्ते आहेत त्या रस्त्यांचे रुंदीकरण करताना अंतरात तडजोड करून रस्त्यांचे रुंदीकरण करून घ्यावे, असे रत्नागिरी नगर परिषदेला निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगर परिषदेने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
रत्नागिरी मध्यवर्ती स्थानकाच्या खालचा भाग हा फारच दाटीवाटीचा आहे. त्यामुळे पूर्वीपासून असलेले काही अंतर्गत रस्ते 8 ते 10ा फूट रुंदीचे आहेत. रत्नागिरी शहर विकसित करण्यासाठी मारूती आळीतील रस्त्यांसारखे अरुंद रस्ते 30 ते 40 फूट रुंद व्हावेत, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते रुंदीकरणात काहींची जागा आणि घरांचा काही भाग जाणार असल्याने काही ठिकाणी रुंदीकरणाला विरोध झाला. त्यामुळे रुंदीकरणाची ही प्रक्रियाच थांबून गेली होती.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता आता काँक्रीटचा झाला आहे. शहरातील प्रत्येक शासकीय रुग्णालयाची इमारत भव्य झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी शिवसृष्टी, तारांगण, मल्टिमीडिया शो अशी अनेक विकासकामे झाली आहेत. अशा सुंदर शहरातील खालच्या भागातील अरुंद रस्ते रुंद होवून शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामात लक्ष टाकले आहे. पालकमंत्र्यांनी निधी दिल्याने अंतर्गत रस्ते नव्या रस्त्यांनी एकमेकांना जोडले गेले आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी रुंदीकरणाला विरोध आहे त्याठिकाणी अंतरामध्ये तडजोड करून ते रस्ते रुंद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेने कार्यवाही सुरू केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 21-04-2025














