रत्नागिरी : निस्पृह, निर्भीड आणि संविधान मूल्यांचे जतन करणारे मुख्य न्यायमूर्ती पद मिळणार नव्हते, याची कल्पना न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांना होती. त्यांनी एका आणीबाणीवेळी संविधानासाठी दिलेले मत आजच्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. याकरिता हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचले पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.
रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक अॅड. विलास पाटणे यांनी शब्दबद्ध केलेल्या न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ म्हणून प्रसिद्ध न्यायमूर्ती एच. आर. खत्रा यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. विवेक बैंक्वेट हॉलमध्ये कार्यक्रम झाला. याप्रसंगी मकरंद कर्मिक, माधव जामदार, सुनिल गोसावी, विलास पाटणे, प्रशांत रेळेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड, राजशेखर मलुष्टे यांनी केले, अॅड. रत्नदीप चाचले यांनी आभार मानले.
न्या. वराळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धिक, साहित्यिक, उदारमतवादी, परस्पर मतांचा विचारांचा आदर करण्याची परंपरा आहे. वैचारिक मतभेद असले तरीही स्नेहसंबंधात अडसर ठरता कामा नये. या परंपरेपासून आपण दूर जाता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणूक केली पाहिजे.
याप्रसंगी न्या. मकरंद कर्णिक म्हणाले, आपण संविधान वाचतो. परंतु त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे. भारतात रामायण, महाभारत, पंचतंत्र आहे, ती सर्वांना शिकवण देते. न्याय देताना त्याचा उपयोग होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात न्यायव्यवस्था चोख होती. ती फारच प्रगतिशील होती. तसेच यावेळी न्या. गोसावी यांनी विधी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आवाहन केले. अॅड. पाटणे यांनी पद्मविभूषण न्यायमूर्ती हंस राज खत्रा यांच्यावर चरित्रात्मक लेखनाचा प्रयत्न केला आहे. संविधान वाचवण्यासाठी त्यांनी योगदान दिले, त्यामुळे हे पुस्तक खूप महत्वाचे आहे, असे सांगितले.
रत्नागिरीवर नेहमीच लक्ष
न्या. जामदार म्हणाले की, रत्नागिरीचे पालक न्यायमूर्ती म्हणून माझ्यावर जबाबदारी आली, त्यानंतर आठवडाभरात रविंद्रनाथ टागोर यांच्या म्युरलचे अनावरण रत्नागिरी न्यायालयाच्या आवारात झाले व नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यात न्यायालयाचे भूमिपूजन झाले. रत्नागिरीकडे माझे नेहमीच लक्ष असते.
रवींद्रनाथांची आठवण
न्यायमूर्ती वराळे यांनी रवींद्रनाथ टागोरांची आठवण जागवली. ते म्हणाले की, यापूर्वी मी रत्नागिरीत झालेल्या नाट्य संमेलनाला आलो होतो. कारण संमेलनाचे अध्यक्ष राम जाधव हे माझ्या बहिणीचे सासरे आज पुस्तक प्रकाशनासाठी आलो व रत्नागिरी न्यायालयाच्या आवारात रवींद्रनाथ टागोर यांचे स्मृतिशिल्प पाहून आनंद झाला. माझे वडील सोलापूरला जिल्हा न्यायाधीश झाले, त्यावेळी तिथल्या न्यायाधीशांच्या बंगल्याला मोठा इतिहास असल्याचे वडिलांना माहिती होते. कारण तिथे न्या. सत्येंद्रनाथ टागोर जिल्हा न्यायाधीश असताना राहायला होते व त्यांचे बंधू रवींद्रनाथ टागोर हेसुद्धा काही काळ वास्तव्याला होते. त्या काळात त्यांनी भरपूर लेखन केले, त्यामुळे त्यांची आठवण म्हणून वडिलांनी बंगल्याबाहेर स्मृतिशलाका लावली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 21/Apr/2025














