अनुस्कुरा घाटातील संरक्षक फौजेची माहिती देणाऱ्या मध्ययुगीन शिलालेखाचा उलगडा

राजापूर : देश आणि कोकणाला जोडणारा सह्याद्रीच्या घाट मार्गातील अनुस्कुरा घाट सातवाहन काळापासून अस्तित्वात आहे. सुमारे 2000 वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारा या फरसबंदी मार्गाचा वापर व्यापार, धार्मिक प्रवास व स्थलांतरासाठी केला जायचा.

यामुळे प्राचीन आणि मध्ययुगातही या मार्गाचे महत्त्व अबाधित होते. या घाट मार्गातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी अनुस्कुरा घाटात सज्ज असणाऱ्या संरक्षक फौजेची माहिती देणाऱ्या 17 व्या शतकातील देवनागरी लिपीतील शिलालेखाचा उलगडा शिलालेख तज्ज्ञ अनिल दुधाणे व अथर्व पिंगळे यांनी केला आहे. दुर्ग अभ्यासक भगवान चिले व प्रतीक पाटील यांच्या मदतीने या शिलालेखाचे वाचन केले आहे.

चौकवाडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गावाजवळ अनुस्कुरा घाटाचा माथा आहे. उगवाई देवी मंदिर परिसरातील घाटाच्या उतरत्या वाटेवर एका शिळेवर हा शिलालेख कोरला आहे. कोरीव स्वरूपातील शिलालेखावर देवनागरी लिपीतील अशुद्ध मराठी भाषेत पाच ओळी कोरण्यात आल्या आहेत. शिलालेखाचा दगड आकाराने मोठा आणि ओबडधोबड आहे. या संशोधनासाठी कोल्हापूर गॅझेटर, शिवछत्रपतींचे चरित्र, कोकणच्या इतिहासाची साधने, शिवराज्य व शिवकाळ, काही घाटमार्ग चौक्या व संकीर्ण, सभासद बखर, विशाळगड त्रयोदशी आदी संदर्भ ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे.

शिलालेखाचे महत्त्व
लेखात आलेला कालो (कोळी) सदाशिव हा कदाचित महादेव कोळी समाजाची व्यक्ती असावा. त्याने या दुर्गम प्रदेशात युवकांना युद्ध प्रशिक्षण देऊन शत्रूपासून बचावासाठी दल निर्माण (वीरांचा वंश) केला असावा. तात्पुरती वसतिस्थान, पहाऱ्याची जागा, लपून बसण्याच्या तसेच शस्त्र, साहित्य दडवण्याच्या जागा आसपास तयार केल्या. जर या वाटेवर शत्रू आला तर त्यावर इंद्राच्या शस्त्रासारखे वज्रप्रहार त्यावर पडेल, आक्रमण होईल, त्यात त्याचा पराभव होईल. शिलालेखाच्या शिलेवर एका वीराचे वज्रप्रहार करतानाचे शिल्पही आहे. लेखात देघिन हा तुर्की शब्द असून याचा अर्थ तुर्की फौजा असा होतो.

अनुस्कुरा घाटाला दोन हजार वर्षाचा इतिहास…
अनुस्कुरा घाट व्यापार मार्गातील एक महत्त्वाचा भाग असून देश व कोकणाला जोडत हा घाट मार्ग सातवाहन काळात निर्माण करण्यात आला. सुमारे 2000 वर्षांपूर्वीचा हा पक्का फरसबंदी मार्ग आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील राजापूर बंदरावरून ये-जा करणाऱ्याला घाटावरचा दक्षिण सह्याद्री मधला प्राचीन मार्ग म्हणजे अनुस्कुरा घाट. शिलाहार राजा भोज यांनी या घाटमाथ्यावर नजर ठेवण्यासाठी विशाळगड बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1659 साली पन्हाळगडाबरोबरच विशाळगडही जिंकला. त्यामुळे सह्याद्रीच्या या परिसरातील संपूर्ण घाटमाथे शिवछत्रपतींच्या ताब्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 21/Apr/2025