चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात प्रामुख्याने बाजारपेठेत स्वच्छता राहावी यासाठी विविध उपाय राबवले जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रात्री बाजारपेठ बंद होण्याच्या कालावधीत घंटागाडीच्या माध्यमातून काही व्यापाऱ्यांकडील ओला कचरा गोळा करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, ओला कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषद कडून वापरण्यात येणाऱ्या भंगार घंटागाडीमुळे गाडीतील अर्धा ओला कचरा रस्त्यावर तर अर्था कचरा गाडीत गळती लागल्यासारखा पडत आहे.
ही बाब गेले काही दिवस गांधी चौक परिसरात घडत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी नगर परिषदच्या निदर्शनास आणूनही त्यात कोणताही बदल न झाल्याने व्यापाऱ्यांकडून संतप्त व उपरोधिक टीका केली जात आहे.

यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहेच त्यात या दुर्गधीकडे उनाड जनावरे, श्वान आकर्षितही होत असल्याने त्याचा नाहक त्रास परिसरतील नागरिकांना होताना दिसून येत आहे. राज्यातील पहिला कचरा खत प्रकल्प उभारण्यात चिपळूण नगर परिषदचा पहिला क्रमांक लागतो. तसेच शहर कचराकुंडी मुक्त करण्यात चिपळूण नगर परिषद कोकणात प्रथम असल्याची ओळख आहे.
शहरातील नागरी वस्ती व व्यापाऱ्यांचा कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून घंटागाडीचे नियोजन आहे. त्यानुसार पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काही ठराविक टप्पे आणि वेळेच्या कालावधीत शहरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या फिरत असतात. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत चिपळूण नगर परिषदला पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, सध्या हे नियोजन योग्य पद्धतीने राबवले जात नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांचा ओला कचरा गोळा करण्यासाठी प्रशासनाकडून एक घंटागाडी बाजारपेठ बंद होण्याच्या सुमारास फिरवली जाते. मात्र ही गाडी भंगार अवस्थेत आहे. त्यात टाकलेल्या कचऱ्याला गळती लागल्यासारखे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गांधी चौक पानगल्ली परिसरातील व्यापाऱ्यांचा ओला कचरा गोळा करण्यासाठी उभी करण्यात आलेल्या घंटागाडीतूनच ओल्या कचऱ्यातील पाणी तसेच बारीक ओला कचरा तसेच घाण गाडीतून रस्त्यावर पडत आहे.
अर्धा कचरा गाडीत तर अर्धा कचरा रस्त्यावर अशी स्थिती दिसून येत आहे. रस्त्यावर पडलेल्या ओला कचरा पुन्हा नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत गोळा करावा लागत आहे. म्हणजेच एक काम दोन वेळा करण्याचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. या परिसरातील हॉटेल, भाजी, फळ व्यावसायिकांचा यांचा बहुतांश ओला कचरा रात्रीच्यावेळी या घंटागाडीत व्यापाऱ्यांकडून दिला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गळक्या, भंगार घंटागाडीतून ओल्या कचऱ्याचे लगदे गाडीतील फाटक्या पत्र्यातून रस्त्यावर गळून पडताना दिसून येत आहेत.
नगर परिषदेने मध्यंतरात कचरा गोळा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुस्थितीतील वाहने घेतले आहेत. तसेच खास ओला कचरा गोळा करण्यासाठी छोटी बंदिस्त वाहने देखील घेतली आहेत. मात्र, प्रत्यक्षात बाजारपेठेत ओला कचरा गोळा करण्यासाठी ही छोटे वाहने वापरण्याऐवजी सध्या अनेक ठिकाणी फाटलेला व गंजलेला व खराब पत्रा असलेली भंगार गाड़ी वापरली जात आहे. परिणामी ओल्या कचऱ्याला गळती लागून रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याला पुन्हा काम करावे लागत आहे.
या बाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ व्यापाऱ्यांनी संपर्क करून माहिती दिली असता गाडी बदलून मिळेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे आता व्यापारीदेखील नगर परिषदच्या या भंगार घंटागाडीवरून उपरोधीक टीका करू लागले आहेत तर येत्या काही दिवसांत यामध्ये बदल न झाल्यास या गाडीचे सुशोभिकरण करून शहरातून मिरवणूक काढावी लागेल अशा उपरोधीक टीकेचा सूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांतून उमटत आहे.
प्लास्टिकची ताडपत्री का काढली ?
चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून घंटागाडी द्वारे ओला व सुका कचरा उचलला जातो. घंटागाडीच्या बाहेर कचरा पडू नये म्हणून कचऱ्यावर प्लास्टिकची ताडपत्री टाकण्यात येत होती. मात्र गेल्या वर्षभरापासून घंटागाड्या वर ताडपत्री दिसून येत नाही त्यामुळे घंटागाडीतील ओला तसेच सुका कचरा रस्त्यात पडत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान राबवणाऱ्या चिपळूण नगर परिषदेने घंटागाड्या मधून ओला तसेच सुका कचरा बाहेर पडू नये यासाठी तातडीने पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 21/Apr/2025














