रत्नागिरी : रास्त धान्य दुकानदारांसाठी ३०० रुपये कमिशनची मागणी

रत्नागिरी : वाढती महागाई, दुकानांचा खर्च, मेहनत याचा विचार करता प्रति क्विंटल ३०० रुपये कमिशनची मागणी यापूर्वीच राज्य फेडरेशनने सरकारकडे केली आहे. त्यामुळे तेवढी वाढ शासनाने द्यावी, अशी मागणी करत तुटपुंजी वाढ आम्हाला मान्य नसल्याचे जिल्हा रास्त दर धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, गेली कित्येक वर्षे रास्त धान्य दुकानदार शासनाच्या योजनांखालील धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याचे काम करीत आहेत. काही वर्षे मागे जाता दुकानदारांना केवळ ७० रुपये प्रति क्विंटल कमिशन मिळत होते. ते वाढवावे म्हणून संघटना शासनाकडे पाठपुरावा करत होत्या. त्यामुळे २०१८ साली कमिशनमध्ये ८० रुपये वाढ करून ते १५० रुपये करण्यात आले. मात्र महागाई, कर्मचारी पगार, वीज बिल, दुकानांचे भाडे याचा विचार करता दुकानदाराला यातून अगदी तुटपुंजी रक्कम मिळते. त्यामुळे हे कमिशन ३०० रुपये करावे, अशी मागणी राज्य व केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.

२०२२ साली केंद्र सरकारने २० रुपये वाढ जाहीर केली आहे. मात्र, आजतागायत यातील एकही रुपया राज्य शासनाने दुकानदारांना दिलेला नाही. असे असताना आता २० रुपये कमिशन वाढ देण्याचा विचार राज्य शासन करत आहे. ते जाहीर झाले असले तरी अद्याप त्याला शासकीय दुजोरा नाही. मात्र, तरीही अशी तुटपुंजी वाढ शासन करणार असेल तर ती आम्हाला मान्य नसल्याचे कदम यांनी नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 22/Apr/2025