चिपळूण : काविळतळी परिसरातील समस्या सोडवण्याची मागणी

चिपळूण : शहराचे उपनगर काविळतळी परिसरातील बाळकृष्ण नगर, वांगडे मोहल्ला, गांधीनगर येथील अंतर्गत रस्ते करताना पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था योग्य पद्धतीने न केल्यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात या ठिकाणी पाणी तुंबण्याची भीती आहे. तरी या संदर्भात नगर परिषद प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने नियोजन करावे, अशा मागणीच्या निवेदनासह अन्य मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन (भैया) कदम यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

यावेळी क्षेत्रप्रमुख वाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी शहरप्रमुख राजू देवळेकर, महिला आघाडीच्या वैशाली शिंदे, शहर युवा अधिकारी पार्थ जागुष्टे आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, शहराचे उपनगर काविळतळी परिसरात सार्वजनिक ठिकाणी विविध समस्या आहेत. बहादूरशेख नाका ते वांगडे मोहल्ला उर्दू शाळेपर्यंत मंजूर झालेला रस्ता निवेदने देऊनही अर्धवट स्थितीत आहे. परिणामी, परिसरातील रहिवाशांची गैरसोय होत आहे. स्वतःच्या घरापर्यंत जाण्यासाठी सुरक्षित रस्ता नाही. बाळकृष्ण नगर ते बांदल हायस्कूलपर्यंत सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारांची सोय नाही. त्यामुळे दूषीत पाणी जमिनीत जाऊन त्या ठिकाणच्या नैसर्गिक बोअरिंगचे पाणी प्रदूषीत झाले आहे. येथील गटाराचे अंदाजपत्रक करूनही काम करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

वांगडे मोहल्ला कब्रस्तानमध्ये वर्षभरापूर्वी हायमॅक्स मंजूर झाला आहे. मात्र, त्या ठिकाणी अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रामुख्याने आरक्षण क्र. १०४ व १०५ मधून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी पर्यायी डीपी मार्ग मंजूर झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती तातडीने व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 22/Apr/2025