खेड : वारकरी परंपरेचा गाढा वारसा कोकणातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने खेड तालुक्यातील काडवली गावात कोकणातील पहिली वारकरी शाळा उभारली जाणार आहे. २४ गुंठे क्षेत्रफळावर साकार होणाऱ्या या शाळेच्या स्थापनेचा प्रारंभ श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे (आंबडस) यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
निवासी वारकरी शाळेत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांना संस्कारक्षम, सुसंस्कृत आणि सजग नागरिक बनवण्याचा संस्थेचा ध्यास आहे.
आजच्या काळात लहान वयातच अनेक मुले व्यसनाधीन होत असल्याचे वास्तव समोर येते. अशा पार्श्वभूमीवर बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माचे बीज रोवण्याची गरज ओळखून ही शाळा उभारली जात आहे. संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देऊन त्यांना आत्मभान आणि पालकांची योग्य ती जाणीव देणे, हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे. श्री गुरुमाऊली संस्थेने यासाठी काडवली येथे पाच वर्षांपूर्वी पासून प्रयत्न सुरू केले होते. आता २४ गुंठे जमीन संपादन केली असून लोकसहभागाच्या बळावर हे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
येथील विद्यार्थ्यांना पारंपरिक व आधुनिक शिक्षणाचा संगम साधत, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, भजन, कीर्तन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य यांचेही शिक्षण दिले जाणार आहे. शारिरीक व बौद्धिक प्रगतीसह अध्यात्मिक उन्नयन घडवण्याचे हे केंद्र ठरणार आहे. या उपक्रमामागे गेली १८ वर्षे कीर्तनसेवा करणारे आणि साडेपाच हजारांहून अधिक कीर्तने सादर केलेले कीर्तनकार राकेश मोरे यांचा दीपस्तंभवत सहभाग असून त्यांच्यासोबत अजिंक्य आंब्रे आणि अन्य पाच सहकारीही कार्यरत आहेत. हा प्रकल्प जनतेच्या सहकार्याने उभा राहणार असल्यामुळे, दानशूर व्यक्तींनी उदारहस्ते मदत करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कोकणातील विद्यार्थ्यांना आता इतरत्र जाण्याची गरज नाही : राकेश मोरे
कोकणातील तरुणाईला वारकरी सांप्रदायाचे सखोल ज्ञान मिळावे, विकृतींचा प्रभाव दूर ठेवून त्यांच्यात परमार्थाचे बोधप्रद विचार रुजावेत, याच हेतूने काडवली येथे ही वारकरी शिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोकणातील विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही, असे कीर्तनकार राकेश मोरे यांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 22/Apr/2025














