पर्यटक निवासांचे खासगीकरणाविरोधात गणपतीपुळेत कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन

गणपतीपुळे : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ३० पर्यटक निवासांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, या विरोधात महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक पर्यटक निवासामध्ये काळी फित लावून निषेध व्यक्त करून आंदोलन केले जात आहे. गणपतीपुळेतही कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून आंदोलन केले.

हे आंदोलन पर्यटन विकास कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर व सरचिटणीस अशोक खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पर्यटन निवास गणपतीपुळे ते संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारे पर्यटन निवास आहे.

खासगीकरणाविरोधात येथील कर्मचारी दि. २८ सप्टेंबरपासून दररोज सकाळी कामावर हजर होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर काळी फीत लावून निषेध व्यक्त करत आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकाला कोणताही त्रास होणार नाही त्याची दक्षता देखील घेतली जात आहे.

ग्रामपंचायत आणि पर्यटन व्यवसाय संघटना यांच्यावतीने वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक रत्नागिरी तसेच व्यवस्थापकीय संचालक मुंबई व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 09/Oct/2024