रत्नागिरी : पीएम उषा अंतर्गत योग, भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळा सुरू

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापकांकरिता योगशास्त्राद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा जाणून घेण्याची कार्यशाळा मंगळवारी सुरू झाली. या कार्यशाळेचा लाभ प्राध्यापकांना आयुष्यभर होईल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) अंतर्गत गतवर्षी अनुदान प्राप्त झाले. त्यातून अनेक उपक्रम सुरू आहेत. त्यातूनच महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात सुरू झालेली ‘योगशास्त्र’ कार्यशाळा पाच दिवस चालणार आहे.

पीए उषा अनुदानाअंतर्गत विद्यार्थी – शिक्षकांसाठी विविध व्यावसायिक, कौशल्य विकसन प्रमाणपत्र अभ्यासवर्ग, शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती प्राचार्यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी व मार्गदर्शक आर्या देवळेकर, समन्वयक डॉ. निधी पटवर्धन उपस्थित होत्या.

कार्यशाळा सकाळी ७.३० ते दुपारी १.१५ पर्यंत चालणार आहे. यामध्ये भारतीय ज्ञानपरंपरा व योग, योगशास्त्र व संशोधन, उपयोजित योग आणि समकालीन प्रासंगिकता, योग व तत्त्वज्ञान, भवितव्य यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात दुर्गादास सावंत, श्रीकांत ढालकर, रुद्राक्ष साक्रीकर, डॉ. जयश्री जोग, सानिका शेरे, मृणालिनी महागावकर, डॉ. हिमानी चाऊकर, डॉ. अतुल ढगे, डॉ. दिनकर मराठे या तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. कार्यशाळा संपूर्ण विनाशुल्क आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 23-04-2025