रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी बाळाराम खेडेकर यांची नियुक्ती केली आहे.
तसेच दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी प्रभारी म्हणून काम पाहणारे लांज्यातील ज्येष्ठ सदस्य दत्ता कदम यांची निवड झाली आहे. जिल्हासंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सहदेव बेटकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि माजी आमदार संजय कदम यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे ठाकरे गटाची ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यातील दक्षिण जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दत्ता कदम यांच्याकडे सोपवली गेली आहे तर उत्तरेकडील रिक्त जागेवर खेडेकर यांची वर्णी लागली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या मुंबईच्या अरूण दुधवडकर यांच्या जागी बेटकरांना नेमले आहे. बेटकर यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
उबाठा शिवसेनेच्या अन्य नियुक्त्यांमध्ये दापोली विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून मुजीब रूमाणे, खेड तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे, खेड शहरप्रमुख म्हणून चंद्रशेखर पाटणे, मंडणगड तालुका संघटक जितेंद्र दवंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष खेराडे, विधानसभा प्रमुखपदी अशोक सक्रे तसेच संघटक म्हणून रामचंद्र सरवणकर, सहसंपर्कप्रमुख जयेश जाधव, उपतालुकाप्रमुख अनाजी गोठम यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 23-04-2025














