राजापूर : उड्डाणपुलाचे रखडलेले काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

राजापूर : शहरातील एसटी आगारासमोरील उड्डाणपुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम सुरू झाले असले तरी संथगतीने सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये काम पूर्ण न झाल्यास १ मे रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राजापूर माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, भाजपचे अरविंद लांजेकर, विवेक ऊर्फ पिंट्या गुरव यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता कुमावत यांच्यासह रखडलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी काम तत्काळ पूर्ण करून उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करावी, अशी मागणी केली. शहरातील डेपोसमोरील उड्डाणपुलाच्या एका बाजूकडील काम काही तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. त्यामुळे आजवर पुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू होती.

रखडलेले काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अॅड. खलिफे, लांजेकर व गुरव यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता कुमावत यांच्यासह सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होईल, अशी ग्वाही अधिकारी यांनी दिली. त्यामुळे आठ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास १ मे रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 23/Apr/2025