अवकाळी पावसामुळे भातकापणीचा मुहूर्त चुकला

चिपळूण : सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह परतीच्या मार्गावर असलेल्या अवकाळी पावसाने चिपळूण शहर परिसराला रविवारी (दि. ६) सायंकाळी झोडपून काढले. सुमारे पाऊण तास सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. परिणामी, भातशेती कापणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचा कापणीचा मुहूर्त चुकला आहे; मात्र काही शेतकऱ्यांच्या भातशेतीला हा परतीचा अवकाळी पाऊस पोषक ठरला आहे.

हस्त नक्षत्राचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. घटस्थापनेच्या दिवसापासून गेल्या चार दिवसांत पावसाने परतीचे संकेत दिले होते. राज्यभरासह देशभरातील मान्सून हंगाम परतीला लागल्याचे सांगितले जात असतानाच, राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारनंतर हवामानात अचानक बदल झाले. असाहाय्य उकाडा सुरू झाला. त्यापाठोपाठ सायंकाळी उशिराने अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचे संकेत देणारे ढग जमा झाले. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला.

इमारतीवरील पत्रे, फलक उडाले
अर्धा ते पाऊण तास वादळी वाऱ्याने शहरात दाणादाण उडाली. काही ठिकाणी इमारतीवरील पत्रे उडाले, तर नवरात्रौत्सव मंडळांनी लावलेले शुभेच्छा फलक विखुरले गेले. तसेच बाजारपेठेतील अनेक ठिकाणचे जाहिरात फलक रस्त्यावर येऊन पडले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:24 PM 09/Oct/2024