संगमेश्वर : मुरडव बौद्धवाडी- गांगरकरवाडी रस्त्यावरील पुल धोकादायक

सावर्डे : संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील आरवली-कुचांबे रस्त्यावर मुरडव बौद्धवाडी गांगरकरवाडी दरम्यान ओढ्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या फरशी पुलाला संरक्षक कठडे व दोन्ही बाजूस भराव घातलेला नाही. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. पुलाचे काम अर्धवट ठेवले आहे.

आरवलीपासून पूर्वेस कुचांबे रस्त्यावर रेल्वेस्थानकाच्या पुढील बाजूस मुरडव बौद्धवाडीनजीक धोकादायक वळणावरील ओढ्यावर ६५ लाख रुपये खर्चुन फरशी पूल बांधण्यात आला आहे.

पुलाचे काम पूर्ण झाले; मात्र आजतागायत पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षक कठडे बांधलेले नाहीत. तसेच पुलाच्या दोन्ही टोकास भराव टाकणे गरजेचे असताना तोही टाकलेला नाही. हा पूल वळणावरच असल्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. काळोख्या रात्री तर वाहनांना अंदाज न आल्यास कठडे नसल्याने वाहन थेट ओढ्यात कोसळण्याची शक्यता आहे. पुलाचे अर्धवट काम विनाविलंब मार्गी लावावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश परकर यांनी केली आहे.

खात्याकडे पुरेसा निधी नसल्याने ठेकेदाराला पुलाच्या कामाचे पैसे देता आले नाहीत. त्यामुळे त्याने हे काम अपूर्ण ठेवले. आता त्याला पैसे मिळाले आहेत. पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्याला दिल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण होतील- बोरजे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देवरूख.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 23/Apr/2025