राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने केले जात आहे; मात्र महामार्गावरील अनेक ठिकाणच्या थांब्यावर पिकअप शेड नसल्याने प्रवाशांना ऊन-पावसात रस्त्यावरच उभे राहावे लागत होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच महामार्गावर प्रवाशांसाठी निवारा आणि पिकअप शेड मंजूर झाले आहेत.
त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून शासनाकडे महामार्गावर पिकअप शेड उभारावेत, ही मागणी केली होती. मंजूर झालेल्या पिकअप शेडमध्ये राजापुरातील सात पिकअप शेडचा समावेश असून त्याची निविदा प्रक्रिया झाली आहे. पिकअप शेड उभारण्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरू होणार असल्याचे लांजेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रवाशांची आता गाड्या पकडण्यासाठी उन्हासह पावसापासून सुटका होणार असल्याने उन्हाळे ग्रामस्थांसह प्रवाशांकडून माजी खासदार राणे, लांजेकर यांच्यासह धन्यवाद दिले जात आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांसाठी पिकअप शेड व्हावेत, या मागणीसाठी उन्हाळे गंगातीर्थ ग्रामस्थांसमवेत जानेवारी महिन्यामध्ये आपण उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. उन्हाळे येथील महिलांसह ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्या वेळी बांधकाम विभागाने सहा महिन्यांमध्ये पिकअप शेड मंजूर करण्याचे आपणाला गंगातीर्थ ग्रामस्थांसह लेखी आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पिकअप शेड मंजूर झाले असून, प्रवाशांची समस्या सुटली आहे. अरविंद लांजेकर, भाजयुमो, राजापूर तालुकाध्यक्ष
राजापुरातील मंजूर पिकअप शेड
उन्हाळे-गंगातीर्थ, उन्हाळे-आग्रेवाडी, शासकीय विश्रामगृह राजापूर, हातिवले, मारुती मंदिर (हातिवले), कोंड्ये, पन्हळे, टाकेवाडी, काझीवाडी, कोंडीवळे, खरवते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 09/Oct/2024














