लांजा : काहीजणं म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी मंत्री बनणार आणि मंत्री झाल्यावर ठेकेदारांना सोडणार नाही; पण आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी प्रथम ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवले पाहिजे, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आमदार राजन साळवी यांच्यावर पलटवार केला.
लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. लांजा शहरातील कोर्लेफाटा येथील शिवपार्वती हॉल येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत, तहसीलदार प्रियांका डोले, मुख्याधिकारी हर्षला राणे, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, माजी पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री सामंत यांनी आमदार साळवी यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला.
ते म्हणाले, मी मंत्री झाल्यावर ठेकेदारांना सोडणार नाही, असे वक्तव्य सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत करण्यात आले होते; मात्र पत्रकार परिषद घेणे सोपे आहे. जर भरतशेठ गोगावले आणि संजय शिरसाट यांनी लांजा येथे येऊन पत्रकार परिषद घेतली तर अनेकजण उघडे पडतील. मागील दहा वर्षांत काय झाले आणि या दहा महिन्यात काय झाले? कोणकोणती विकासकामे दहा महिन्यांत पूर्ण झाली, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
महिला, भगिनींसाठी काम करणारे सरकार
हे सरकार महिला, भगिनींसाठी काम करत आहे. त्या महिलाववर्गाने देशाची, राज्याची संस्कृती जपली आहे म्हणूनच त्यांना पंधराशे रुपयांचे बक्षीस सरकारने दिले आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर पंधराशेवरून ही रक्कम दोन हजार रुपये केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी दिले.
नैराश्यातून साळवींची टीका
राजापूर येथेही मंत्री सामंत यांनी आमदार साळवी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, गेल्या १५ वर्षात विकासात्मक कोणतेही काम न केल्याने नैराश्य आलेले माझ्यासह कुटुंबावर वैयक्तिक टीका करत आहेत. माझ्या वडिलांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे; मात्र, ठेकेदारांच्या जीवावर राजकारण करून ठेकेदारांकडून पैसे कमावणे हा गुन्हा आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 09/Oct/2024














