गावखडी येथील मित्रत्व नवरात्र मंडळाची चलचित्र देखाव्यातून गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर जागृती

पावस : शासनाच्या माध्यमातून अनेक किल्ल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे; मात्र पर्यटनाला येणारे पर्यटक, तरुणवर्ग किल्ल्यांना भेटी देतात; मात्र त्याचे पावित्र्य नष्ट करण्याचे काम केले जाते. कचरा, प्लास्टिक तिथेच टाकले जाते. याबाबत प्रबोधन व्हावे, किल्ल्यांच्या संवर्धनाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे यासाठी गावखडी भंडारवाडी येथील मित्रत्व नवरात्र मंडळाने किल्ले संवर्धन व परिसर स्वच्छतेबाबत चलचित्र देखावा साकारला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी भंडारवाडी येथे मित्रत्व नवरात्रोत्सव मंडळातर्फे २५ वर्षे देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. या मंडळातर्फे यावर्षी प्रथमच चलचित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्यादृष्टीने देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून गडकिल्ल्यांचे महत्त्व, त्याचे संवर्धन याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गडकिल्ल्यावर येणारे पर्यटक किल्ल्यावर मद्यपान करून बाटल्या व कचरा टाकून परिसर अस्वच्छ करतात. त्यामुळे किल्ल्यावर अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे लोकांचे प्रबोधन व्हावे व समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी हा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. या संदर्भात गावखडी येथील मित्रत्व नवरात्रोत्सव मंडळाचे संतोष तोडणकर म्हणाले, रयतेच्या स्वराज्यासाठी गडकिल्ले ताब्यात घेऊन एक चांगले राज्य निर्माण केले. त्यामुळेच आज आपण ताठ मानने देशामध्ये वावरत आहोत. त्यांनी निर्माण केलेल्या किल्ल्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे; परंतु नवीन पिता त्या ठिकाणी किल्ले पाहण्यासाठी जात असताना मद्यपान करून अस्वच्छता करतात. याबात जनजागृती करताना नवीन पिढीला त्यातून एक चांगला संदेश मिळावा, हा उद्देश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 09/Oct/2024