चिपळूणातील ग्रॅव्हिटी पाणी योजना मार्गी लागणार

चिपळूण : येथील शहराच्या पाणी योजनेसाठी पालिकेकडून १२५ कोटी ३५ लाखांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, प्राप्त निविदांपैकी श्रमगाथा धुळे या कंपनीची निविदा शासनाने स्वीकारली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कामाची वर्कऑर्डर देऊन ग्रॅव्हिटी योजनेचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.

सुमारे १५ वर्षे शहरात कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी योजना राबवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात होते. ही योजना ग्रॅव्हिटी स्वरूपात असल्याने शहरातील नागरिकांनाही तितकीच उत्सुकता आहे. कोळकेवाडी धरणाच्या १३२ मीटर उंचीवर असलेल्या आऊटलेटमधून पाणी उचलले जाणार आहे. त्यानंतर खेर्डी येथे १०२ मीटर उंचीवर असलेल्या नियोजित साठवण टाकीत हे पाणी आणले जाणार आहे. तेथून पुढे खेर्डी, डीबीजे महाविद्यालय, पाग, गुहागर बायपास व गोवळकोट येथील साठवण टाकीत ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा केला जाणार आहे तसेच शहरातही पाच ते सहा मजल्यावर ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होईल, असे नियोजन केले जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने ग्रॅव्हिटीने पाणी मिळण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात नवी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेला राज्यातील विविध ठिकाणांहून प्रतिसाद मिळाला होता. या कंपन्यांच्या प्रतिनिनी चिपळूण पालिकेला भेट दिली.

मचूळ पाण्याचा प्रश्नही सुटणार
धरणापासून शहरात ७० एमएमची पाईपलाईन टाकली जाणार आहे. खेडर्डी येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या १०० गुंठे जागेत जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने उभारण्यात येणार आहे. शहरातील अंतर्गत पाईपलाईनसह साठवण टाक्यादेखील नव्याने उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे पाईपलाईन गळतीच्या समस्येसह वर्षानुवर्षे असलेला मचूळ पाण्याचा प्रश्नही आपोआप सुटणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 09/Oct/2024