एन्रॉन पुलावरून वाहतूक सुरू

चिपळूण : महापुरात खचलेल्या गोवळकोट-पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाची दुरुस्ती अखेर पूर्ण झाली आहे. सुमारे पावणेचार वर्षांनी मंगळवारी (ता. २२) सायंकाळपासून या पुलावरील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे गुहागरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महापुरात एन्रॉन पूल मध्यभागी खचला होता. २२ जुलै २०२१ नंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला; मात्र हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे प्रवासीवर्गासह स्थानिक नागरिक आणि लोटे एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत होती याशिवाय मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेठमापअंतर्गत मार्गावर वाढल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत होते.

त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांकडून प्रयत्न सुरू झाले.

स्थानिक आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. या पुलाच्या कामासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून व तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरवातीला दोनवेळा निविदा काढल्या; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसरी निविदा प्रकिया
राबवण्यात आली.

ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश दिले; परंतु त्या कंपनीने उशिराने कामाला सुरुवात केली. पावसाळ्यातील कालावधी सोडला तर गेल्या दोन वर्षांपासून या पुलाखालील दुरुस्ती सुरू होती; मात्र आता बांधकाम पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या पुलावर लोड टेस्टिंग केली. अवजड वाहतुकीसही पूल योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पुलावरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा भार काहीसा हलका झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 24/Apr/2025