राजापूर : पाचल बाजारपेठेत दोन गाड्या प्लास्टिक कचरा

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत पाचल बाजारपेठ परिसराची स्वच्छता केली. यामध्ये दोन गाड्या प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्यात दहा पिशव्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत. या उपक्रमामुळे बाजारपेठ परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला असून, महाविद्यालयाच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खापणे महाविद्यालयाच्या स्वच्छता मोहिमेचे उ‌द्घाटन पाचलचे सरपंच बाबालाल फरास यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. मुग्धा देवरूखकर, डॉ. ए. डी. पाटील, प्रा. पी.पी. राठोड, प्रा. एस. जी. चव्हाण, डॉ. एम. आर. कोंडागुर्ले आदी उपस्थित होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जवळेथर तिठा परिसर, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृतिस्थळ परिसर, पाचल बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, पाचल ग्रामपंचायत परीसराची स्वच्छता केली. हातामध्ये खराटा, घमेले घेऊन विद्यार्थी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरलेले होते. यामध्ये सर्वाधिक प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात आला. पिण्याच्या पाण्यासह विविध थंड पेयांच्या प्लास्टिक बाटल्या अधिक होत्या. असा कचरा भविष्यात सर्वत्र पसरू नये, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणार असल्याचे या वेळी जाहीर केले.

खापण महाविद्यालयाचा स्वच्छता उपक्रम खूपच चांगला आहे. या निमित्ताने भविष्यात “मी कचरा करणार नाही’ असे ब्रीद घेऊन सर्वांनी पुढे आले पाहिजे. स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. प्लास्टिकची मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बेजबाबदारपणे ते प्लास्टिक फेकून दिले जाते. त्यामुळे बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात खच पडत आहे. स्वयंप्रेरणेने केलेली स्वच्छता ही खूप मोठी सेवा आहे. – बाबालाल फरास, सरपंच

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 09/Oct/2024