मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याने नितेश राणेंचे अभिनंदन : ॲड. हुस्नबानू खलिफे

रत्नागिरी : मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसायम मंत्री नितेश राणे अभिनंदनास पात्र आहेत, असे उद्गार माजी आमदार काँग्रेसच्या नेत्या ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी काढले.

मत्स्य व्यवसायाला शासनाने कृषीचा दर्जा दिल्याने याचा फायदा समस्त मच्छीमार व्यावसायिक आणि बांधवांना होणार आहे. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे कोकणातील आहेत. त्यांना इथल्या मच्छीमारांचे प्रश्न, समस्या यांची चांगली जाण आहे. या खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अत्यंत धडाडीने व तडफतेने काम करणाऱ्या श्री. राणे यांचे या निर्णयासाठी अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा द्यावा अशी मागणी आपण विधान परिषदेत अनेक वेळा केली होती. मात्र त्यावेळी याबाबत गांभीर्याने विचार केला गेला नाही, अशी खंतही अॅड. सौ. खलिफे यांनी व्यक्त केली. अशा प्रकारे कृषीचा दर्जा मत्स्य व्यवसायाला दिल्यास त्याचा लाभ कोकणातील छोट्या मोठ्या मत्स्य व्यावसायिकांना होणार आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून ते पारंपारिक छोट्या मच्छीमारांसह मच्छी व्यावसायिकांसाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. त्याचे परिणाम दिसून येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

यापुढेही अशाच प्रकारे श्री. राणे यांनी कोकणातील समस्त मच्छीमार बांधवांसाठी त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी असेच चांगले काम करत राहावे. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असेही अॅड. खलिफे यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 24-04-2025