रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे नगर परिषद प्रशासन जिल्हा सहआयुक्त पदासह राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. या तिन्ही पदांचा कार्यभार बदली झालेले मुख्याधिकारी बाबर यांच्याकडे होता.
राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद, नगर परिषद प्रशासनाच्या सह आयुक्त पद रिक्त असल्याने या दोन्ही पदांचा कार्यभार रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वैभव गारवे यांनी शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांना अपेक्षित असलेली स्वच्छता राखली जावी यासाठी आरोग्य विभागाला यासंदर्भात सक्त सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
नूतन मुख्याधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय करु नये असे सांगितले आहे. त्याचबरोबर अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या न हटवल्यास कारवाई केली जाईल असे प्रत्यक्ष भेटून टपरी आणि हातगाडीवाल्यांना अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 25/Apr/2025














