देवरुख : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रेल्वे स्थानकाचा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेत असतात. गतवर्षामध्ये या स्थानकाचे ४९ लाख रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. यावर्षीचे ५ कोटी ८५ लाख १३ हजार ६४६ रुपये इतके उत्पन्न स्थानकाला प्राप्त झाले. असे असतानाही रेल्वे प्रशासनाकडून ३ मंजूर झालेल्या एक्स्प्रेस ना थांबा दिले जात नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
गेली दिड वर्षात सतत पाठपुरावा करणारी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुकवरही संघटना, कायम कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. गतवर्षीचे अन् यावर्षीचे वार्षिक उत्पन्न व यात झालेली वाढ प्रशासनाला दाखवून देखील रेल्वे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील २०२३-२०२४ चे वार्षिक उत्पन्न हे ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ रुपये एवढे होते. १ एप्रिल २०२४- मार्च २०२५ यावर्षीचे उत्पन्न ५ कोटी ८५ लाख १३ हजार ६४६ रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी ४९ लाख रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. यातूनच दररोजच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होते असल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब कोकण रेल्वेच्या फायद्याचे असतानाही येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी कोकण रेल्वे प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत नाही.
संगमेश्वर रेल्वे स्थानकातून काही अंतरावर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाने हे स्मारक स्थळ बहुचर्चित झाले आहे. पर्यटकांची झुंबड संगमेश्वर येथे दाखल होते. त्यात रेल्वेचा प्रवास केलेले पर्यटक पुन्हा रेल्वे प्रवास नको! असा नाराजीचा सूर आळवताना दिसून येत आहेत.
गोवा, केरळ याच धर्तीवर संगमेश्वरकडेही पर्यटक आकर्षित होत आहेत. असे असले तरी आताचा कोकण रेल्वेचा प्रवास हा अलोट गर्दीने करावा लागत आहे. यासाठीच या स्थानकांवर ३ एक्स्प्रेसला थांबा मिळाल्यास गर्दीचा ओघ देखील कमी करता येणार आहे. हाच विचार लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जनसामान्यांनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात राजधानी एक्सप्रेस अडवून निषेध नोंदवण्याचा विचार केला. तसे निवेदन कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिले. त्या पत्राचीही म्हणावी तशी दखल घेतली नाही.
आमदार शेखर निकम, खासदार नारायण राणे यांच्यासह काही राजकीय नेत्यांनी कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला पत्रे दिली. पण यंत्रणा वेग घेत नसल्याचे बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 25/Apr/2025














