चिपळूण शहरातील पूररेषा निश्चितीअभावी विकासाला खीळ

चिपळूण : शहर परिसरातील पूररेषा निश्चित करणाऱ्या शासनाकडून निर्देशित केलेल्या लाल व निळ्या रेषेमुळे चिपळूण कात्रीत सापडले आहे. पूररेषा रद्द होणार नाही; मात्र पालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच पुढील सहा महिन्यात बदल होईल, अशी अशा बांधकाम व्यावसायिकांना आहे. चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी पूररेषेला विरोध केला; परंतु जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पूररेषा निश्चित होत नसल्यामुळे विकासाला खीळ बसली आहे.

नवीन बांधकाम थांबल्यामुळे कोट्यवधी रुपयाची होणारी गुंतवणूक थांबली आहे. पूररेषेमुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. एका वर्गात निषिद्ध क्षेत्र तर दुसऱ्या वर्गाला नियंत्रित क्षेत्र संबोधले गेले आहे. निषिद्ध क्षेत्रामध्ये नदीच्या डाव्या व अख्ख्या तीरानजीकची निळी पूररेषा तर नियंत्रित क्षेत्रामध्ये दोन्ही तीरावरील निळ्या रेषेपासून त्याच ठिकाणी असलेली लाल रेषा यामधील क्षेत्राला नियंत्रित क्षेत्रात सामावण्यात आले आहे. या रेषांमुळे नव्या बांधकामांना अडचणी तर जुन्या बांधकामांच्या पुनर्बाधणीला अडचणी नसल्याचे सांगितले जाते; मात्र, या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रद्द करण्याची मागणी होत आहे.

याबाबत चिपळूण पालिकेने नागरिकांसाठी दिलेल्या जाहीर सूचनेनुसार, शहरातील वाशिष्ठी व शिवनदीच्या तिरावर निळी व लाल रेषेचे मार्किंग केलेले नकाशे जलसंपदा विभागास प्राप्त झाले आहेत. निळी रेषेअंतर्गत सरासरीनुसार २५ वर्षांतून एकदा अथवा वारंवार येणारा पूर, त्यामध्ये बाधित होणारे क्षेत्र दर्शवण्यात आले आहे. लाल रेषेमध्ये सरासरीने शंभर वर्षातून एकदा पूर दर्शवण्यात आला आहे.

चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात पूररेषा लादल्यानंतर येणारी गुंतवणूक थांबली आहे. नव्याने घर बांधता येत नाही, ही नागरिकांची अडचण आहे. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पुढील सहा महिन्यांमध्ये निर्णय अपेक्षित आहे. पूररेषा रद्द करावी, अशी आमची मागणी आहे- अभिजित खताते, उपसरपंच, खेर्डी

निळी पूररेषा
निळ्या पूररेषेमध्ये शहरातील गोवळकोट परिसरातील काही भाग, पेठमाप परिसरातील तांबटआळी, परीटआळी, गोवळकोट रोड, मुरादपूर, मुरादपूर मोहल्ला, वडार कॉलनी, शंकरवाडी, वाणीआळी, बापट आळी, बेंदरकर आळी, भोगाळे परिसर, बाजारपेठ, मार्कंडी व काविळतळी, पागमळा काही भाग, महालक्ष्मीनगर आदींचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 25/Apr/2025