PAK vs ENG : जो रुटचे पाकिस्तानविरुद्ध तुफानी शतक.. 4 दिग्गजांना टाकले मागे

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जो रूट काही काही थांबेना. रुट कसोटी क्रिकेटमध्ये एकामागून एक शतके ठोकत आहे. आता रुटने पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले.

जो रूटचे कसोटी क्रिकेटमधील हे 35 वे शतक आहे आणि त्याच्या शतकाच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत चार दिग्गजांना मागे टाकले आहे.

जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये तो भारतीय दिग्गज राहुल द्रविडची बरोबरी करण्यापेक्षा फक्त एक शतक कमी आहे. कसोटी क्रिकेटमधील 35 व्या शतकासह, जो रूटने 4 दिग्गजांना मागे सोडले आहे. ज्यात सुनील गावसकर, ब्रायन लारा, महेला जयवर्धने आणि युनूस खान यांचा समावेश आहे. या सर्वांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 34-34 शतके झळकावली होती. 2024 मधील जो रूटचे हे 5 वे शतक आहे ज्यामध्ये त्याने या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर (भारत) – 51 शतके
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 45 शतके
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 41 शतके
कुमार संगकारा (श्रीलंका) – 38 शतके
राहुल द्रविड (भारत) – 36 शतके
जो रूट (इंग्लंड) – 35 शतके

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मुलतान येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात यजमान पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात एकूण 556 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडकडून आतापर्यंत आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली असून, वृत्त लिहिपर्यंत त्यांनी 64 षटकांत 3 गडी गमावून 323 धावा केल्या होत्या, त्यात जो रुट 102 धावांवर नाबाद होता. तर हॅरी ब्रूकही 53 धावा करून फलंदाजी करत होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 09-10-2024