पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा निषेध, पर्यटन स्थळांना सुरक्षा द्यावी : ललित गांधी

नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मध्ये आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून महाराष्ट्र चेंबरतर्फे देशातील व राज्यातील पर्यटन स्थळावर सुरक्षा देण्याची मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.

या आतंकवादी हल्ल्यामुळे केवळ जम्मू-काश्मीर राज्याच्या अर्थव्यवस्थेवरच परिणाम होणार आहे असे नसून एकूणच पर्यटन क्षेत्रावर होत आहे. काश्मीर हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे जगामधील अनेक देशातून साततयाने पर्यटक येथे येत असतात. साहजिकच हे एक विशेष संवेदनशील असे पर्यटन राज्य आहे. या दृष्टीने केंद्र सरकार आणि तेथील राज्य सरकार यांज डोळ्यात तेल घालून विशेष दक्षता घ्यावयास हवी. काश्मीर प्रमाणेच भारतातील इतर राज्यातही व खास करून महाराष्ट्र अशी महत्वाची पर्यटन केंद्रे आहेत. प्रामुख्याने यामध्ये सागर किनारे, वेरूळ-अजिंठा लेण्या, महत्वाचे गड-किल्ले आणि त्रयंबक, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, अशी धार्मिक क्षेत्रे आहेत. या सर्व ठिकाणी देखील शासनाने विशेष दक्षतेने सुरक्षा व्यवस्था सतत ठेवावी असे आवाहन आहे. त्यामुळे पर्यटन उद्योगालाही आवश्यक ते स्वरक्षण आणि दिलासा मिळेल. जम्मू-काश्मीर येथील भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकही जे हकनाक मारले गेले आहेत त्याबद्दल महाराष्ट्र चेंबरच्या वतीने आम्ही दुःख व्यक्त करीत आहोत व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सामील आहोत. तसेच मृत व्यक्तींप्रती श्रद्धांजली अर्पण करत आहोत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 25-04-2025