औद्योगिकरणाचा फटका ? लोटे पंचक्रोशीत उन्हाळी पिकात घट

खेड : औद्योगिकरणामुळे नोकरीधंदा मिळाला असला तरीही पारंपरिक उन्हाळी पीक लोटे पंचक्रोशीतून गायब होऊ लागले आहे. हापूस आंब्यासह रायवळ आंब्याच्या उत्पादनातही घट होत आहे. त्यामुळे औद्योगिकरणाच्या जाळ्यात लोटे पंचक्रोशीत ना उन्हाळी पिके घेता येते ना हापूसचे उत्पादन, अशी स्थिती आहे.

खेड तालुक्यातील ‘लोट्याचा माळ’ म्हणून ओळख असणाऱ्या आवाशी, असगणी, लोटे, घाणेखुंट, पिरलोटे या पंचक्रोशीत साधारणपणे चाळीस वर्षांपूर्वी औद्योगिक वसाहत कार्यान्वित झाली. सुरुवातीच्या काळात कारखान्यांची संख्या मोजकी होती. हळूहळू रासायनिक कारखान्यांची संख्या वाढली. या कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले; मात्र, त्याचवेळी प्रदूषणाचाही मुद्दा पुढे आला. रासायनिक कारखान्यांमुळे लोटे परिसरातील नैसर्गिक विहिरी नाले, ओढे, परे, तलाव प्रदूषित झाले आहेत. त्याचबरोबर भातशेतीसह फळबागाही उद्ध्वस्त होऊ लागल्या.

वाढत्या प्रदूषणामुळे येथील उन्हाळी शेतीही नष्ट झाली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचा आनंद घेण्यासाठी अनेकांना खेडसह चिपळूणलगत असलेल्या गावातून जावे लागत आहे. परिसरातील झाडांच्या पानांवर राख आणि बुरशीजन्य पदार्थ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे झाडांची फळधारणा मृतावस्थेत झाली आहे. या भागातील आंबे, काजू, करवंदे, बोरे, फणस, कोकम, चिकू, पेरू या फळांचे उत्पादनही कमी झाले आहे. या परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांनी भातशेतीच करणे सोडून दिले आहे.

रासायनिक कंपन्यांमधून सोडण्यात येणारे पाणी आणि धूर यामुळे औद्योगिक वसाहतीतील वातावरण दुषित झालेले आहे. याचा परिणाम सद्यःस्थितीत शेतीसह बागायती शेतीवर दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात हा भाग उद्योगक्षेत्रात आघाडीवर असला तर शेती बागायती मात्र समूळ नष्ट झालेली दिसून येईल. – विश्वास चाळके, प्रगतिशील शेतकरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 26/Apr/2025