रत्नागिरी : शाळा, अंगणवाड्यांच्या ‘जिओ टॅगिंग’ ला सुरुवात

रत्नागिरी : शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असलेल्या कामकाजात अंगणवाड्यांमध्ये एकसुत्रीपणा आणण्यासाठी सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रासह ‘जिओ टॉगंग’ करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी येत आहेत.

या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजनांच्या आखणी व अंमलबजावणीसाठी होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग सुरू करण्यात आले आहे.

राज्यभरातील सर्व शाळांबाबतची माहिती केंद्र शासनाच्या यूडायस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, यामध्ये गाव, चावड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, रस्ते, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या जवळ शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्या उपलब्ध नव्हती.

एमआरएसएसीकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व यूडायस संकेतस्थळावरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून ती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे एमआरएसएसीमार्फत सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रांचे मॅपिंग, अक्षांश व रेखांशासह मोबाईल अॅपद्वारे केले जाणार आहे. यामध्ये विविध विभागांमार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी या माहितीचा उपयोग होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या नेट नसल्याने हे टॅगिंग करताना अडचणी येत आहेत.

जिओ टॅगिंग म्हणजे काय ?
जिओ टॅगिंग म्हणजे फोटो, व्हिडीओ, संकेतस्थळ किंवा इतर माहितीला भौगोलिक स्थान जोडणे. यात अक्षांश आणि रेखांश वापरून माहितीच्या ठिकाणाची अचूक नोंद केली जाते. त्यामुळे स्थान निश्चिती सोपी होते. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येते तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अचूक आणि वेळेत उपाययोजना करणे शक्य होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 26/Apr/2025