लांजा नगरपंचायतीच्या प्रारुप आराखड्याला कुवे ग्रामस्थांचा विरोध

लांजा : येथील नगरपंचायत प्रशासनाने लोकहित बाजूला ठेवून घाईघाईने प्रारूप नगररचना आराखडा कार्यक्षेत्रातील लोकांवर लादण्याचा घाट घातला आहे. याला आमचा कडाडून विरोध आहे. हा विकास आराखडा त्वरित रद्द करावा, अशी मागणी कुवे येथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लांजा नगर पंचायतीचा प्रारूप नगर रचना आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्याचा नकाशा नगर पंचायतीत माहितीसाठी व हरकतीसाठी लावण्यात आला आहे. हा आराखडा टंडन सोल्युशन प्रा. लि., कलिना सांताक्रुझ या खासगी कंपनीने तयार केला आहे. ड्रोनद्वारे आधुनिक कॅमेरे वापरून आराखड्याचे प्रारूप तयार केले आहे. मात्र, ते करताना कोणत्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही, असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे.

नगर पंचायत प्रशासनाने लोकहित बाजूला ठेवून हा आराखडा लोकांवर लादण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर महामार्गालगतच्या जागांचे मूल्य वाढले आहे. या जमिनीवर व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यावर कृषी आरक्षण लादले आहे. त्यामुळे नागरिकांच्या शेतजमिनींचे नुकसान होणार आहे. रस्त्यालगतच्या १९०५ पूर्वीची महसूल माफीची घरे बाधित होणार आहेत.

यातील कुवे क्षेत्रामध्ये एकूण आरक्षणाच्या ७० टक्के भाग कृषक आरक्षण व नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये आरक्षित दाखविण्यात आला आहे. वास्तविक नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लोकांचे नुकसान न होता हा आराखडा कसा तयार करता येईल, याची काळजी घ्यायला हवी होती. परंतु नगर पंचायतीने घाईघाईने आराखडा तयार केला आहे, असा आक्षेप घेत याला कुवे येथील नागरिकांनी कडकडून विरोध केला आहे. हा विकास आराखडा रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून कण्यात आली आहे.

हे निवेदन देताना किसन नेमण, रजनीकांत सुर्वे, श्यामसुंदर खानविलकर, अशोक गुरव, मनोज महिंद्रे, इक्बाल गिरकर आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 26/Apr/2025