Ratnagiri : पावसाची वर्दी देणाऱ्या ‘नवरंगा’चे कोकणात आगमन

रत्नागिरी : पावसाळ्याची चाहूल देणारा म्हणून ओळखला जाणारा नवरंग अर्थात इंडियन पिट्टा पक्षी कोकणात दाखल झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी या पक्ष्याच्या मधुर आवाजाने निसर्गाला एक वेगळीच प्रसन्नता आली आहे.

भारतीय पिट्टा हा पक्षी त्याच्या सुंदर रंगांमुळे विशेष ओळखला जातो. तेलुगू भाषेत ‘पिट्टा’ म्हणजे लहान पक्षी. मराठीमध्ये याला नवरंग, बहिरा पाखर, बंदी किंवा पाऊसपेव असे विविध नावांनी ओळखले जाते. हा पक्षी हिवाळ्यामध्ये दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो. त्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर तो प्रजननासाठी थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रवास करतो.

एप्रिल महिन्यामध्ये श्रीलंका आणि दक्षिण भारतातून स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या बाजूने उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या त्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असून, येथील पक्षी निरीक्षकांनी त्यांचे सुंदर फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली आहे.

पक्षी निरीक्षकांच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात दाखल होतील. त्यानंतर ते गुजरातच्या दिशेने प्रजननासाठी पुढे जातील. पश्चिम घाटावरून स्थलांतर करणाऱ्या सुमारे ९० टक्के नवरंग पक्षी गुजरात किंवा त्याहून उत्तरेकडील भागात प्रजनन करतात. मात्र, काही नवरंग पक्षी कोकणातील दाट झाडी असलेल्या भागांमध्ये घरटी बांधून आपले वास्तव्य करतात.

लहान आकाराचा नवरंग पक्षी त्याच्या आकर्षक रंगांमुळे सहज ओळखता येतो. त्याचे पाय लांब आणि मजबूत असतात, तर चोच जाडसर असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर पालापाचोळ्यामध्ये दडलेले कीटक शोधताना दिसतो. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या पक्ष्याचा मधुर आवाज ऐकायला मिळतो. नर आणि मादी नवरंग दिसायला अगदी सारखेच असतात. नवरंगाच्या आगमनाने कोकणातील निसर्गाला एक नवं सौंदर्य लाभलं आहे, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 26-04-2025